धारावीमध्ये सर्वपक्षीय ‘धारावी बचाओ’ मोर्चा
अदानी समूहापासून धारावी वाचवण्याचे मनसेचे आवाहन
डिलिमिटेशनबाबत बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली भूमिका
Political News : मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून स्थानिक नागरिक आणि लघुउद्योजकांमध्ये नाराजी वाढत आहे. अदानी समूह आणि राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात आज (शनिवारी) धारावीमध्ये सर्वपक्षीय ‘धारावी बचाओ’ मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात विविध राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकार आणि अदानी समूहावर जोरदार टीका केली.
धारावीतील मुकुंद नगर येथील त्रिकोणी गार्डनपासून सकाळी ११ वाजता मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा धारावी एक्सपीरियन्स सेंटरपर्यंत काढण्यात आला. धारावीकरांना त्यांच्याच परिसरात घरे मिळावीत, तसेच स्थानिकांचे पारंपरिक व्यवसाय आणि लघुउद्योगही याच ठिकाणी पुन्हा उभे राहावेत, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.
या मोर्चात सहभागी झालेले मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "आपली नजर जाईल तिथपर्यंत लोक जमले आहेत. हे आंदोलन केवळ धारावीपुरते मर्यादित नसून, मुंबईकरही जागे झाले आहेत. आपल्या जवळच्या माणसाच्या घशात अन्यायाने घास घालण्याचे पाप सरकार करत आहे."
Political News : "... पण त्यांनी माती खाल्ली", संजय राऊतांचा राष्ट्रवादी शरद पवार गटावर निशाणा
धारावीकरांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "आम्हाला वाटत होते की मुख्यमंत्री संवेदनशील आहेत. त्यांना विनंती आहे की त्यांनी धारावीच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. धारावीकरांना याच ठिकाणी घराच्या बदल्यात घर मिळाले पाहिजे. येथील व्यवसायही पुन्हा याच ठिकाणी उभे राहिले पाहिजेत, ही आमची साधी मागणी आहे. याच मागणीसाठी धारावीकर रस्त्यावर उतरले आहेत."
‘सरकार अदानींसाठी एवढे का झुकत आहे?’
धारावी पुनर्विकासासाठी ५५० एकर जमीन अदानी समूहाला दिली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत नांदगावकर यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, "५५० एकर जमीन अदानी यांना दिली जात आहे. अदानी कोण आहेत? त्यांच्यासाठी सरकार एवढे का झुकत आहे? सरकार तुमचे आहे, मात्र त्यावर नियंत्रण अदानी यांचे आहे."
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही धारावीकरांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. "राज ठाकरे यांनी मला सांगितले की, तुम्ही जाऊन धारावीकरांना आपला पाठिंबा व्यक्त करा."
याचबरोबर डिलिमिटेशन बिलावर मत व्यक्त केले आहे. बाळा नांदगावकर यांनी या मु्द्द्यावरील मनसेची भूमिका स्पष्ट केली आहे. डिलिमिटेशनला मनसेचा सध्या तरी विरोध असल्याचे मत व्यक्त केले.
धारावी बचाव मोर्चा कोणाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला?
धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय धारावी बचाव मोर्चा काढण्यात आला.
बाळा नांदगावकर यांनी धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत काय भूमिका मांडली?
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकार आणि अदानी समूहावर टीका केली. धारावीकरांना याच परिसरात घराच्या बदल्यात घर आणि स्थानिक व्यवसायांसाठी पुन्हा याच ठिकाणी जागा मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.
धारावी बचाव मोर्चातील आंदोलकांच्या प्रमुख मागण्या काय आहेत?
धारावीतील मूळ रहिवाशांचे त्याच परिसरात पुनर्वसन करावे, स्थानिक लघुउद्योजक आणि पारंपरिक व्यवसायांना संरक्षण द्यावे, तसेच विकासाच्या नावाखाली नागरिकांचे विस्थापन करू नये, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.