India Thrash Malaysia 6-2 Women's Asian Champions Trophy photo- social media
Sports

India vs Malaysia: भारताच्या वाघिणींचा हल्लाबोल! मलेशियाला ६-२ ने चारली धूळ; टीम इंडियाचा फायनलमध्ये सहाव्यांदा दिमाखात प्रवेश

India Thrash Malaysia 6-2 Enter Women's Asian Champions Trophy Final: भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीत मलेशियाला ६-२ ने पराभूत करून आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

Priyanka Mundinkeri
  • भारतीय महिला हॉकी संघाचा मलेशियावर ६-२ ने विजय

  • सहाव्यांदा फायनलमध्ये टीम इंडिया

  • आता चीनशी विजेतेपदाची लढत

India Thrash Malaysia by 6-2: भारतीय महिला हॉकी संघाने शानदार कामगिरी करत आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भोपाळ येथे खेळल्या जात असलेल्या महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत भारताने मलेशियाला ६-२ ने पराभूत करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले.

उपांत्य फेरीच्या महत्वाच्या सामन्यात दीपिकाने भारतासाठी दोन गोल केले. तर , सुनेलिता टोप्पो , मुमताज खान, नवनीत कौर, आणि इशिका यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसरीकडे, मलेशियासाठी नूरमिराह शकिराह झुल्किफली आणि नूर अझर यांनी प्रत्येकी एक गोल केला. भारतीय संघ २८ नोव्हेंबर रोजी अंतिम सामन्यात चीनचा सामना करेल. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत टीम इंडियाने सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

भारताने पहिल्या हाफमध्ये ४-१ अशी आघाडी

शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी भोपाळमधील नाथू बरखेडा आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये भारत आणि मलेशिया यांच्यात उपांत्या फेरीचा सामना खेळला गेला. या सामन्यात, भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. १० व्या मिनिटाला मुमताज खानने गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १८ व्या मिनिटाला नवनीत कौरने एक शानदार मैदानी गोल करून भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

दरम्यान, फॉर्मात असलेल्या दीपिकाने २५ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. त्यानंतर मलेशियाने २७ व्या मिनिटाला नूर अझरच्या गोलने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, परंतु ३० व्या मिनिटाला दीपिकाने आणखी एका पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून मध्यंतरापर्यंत भारताला ४-१ अशी आघाडी मिळवून दिली.

दुसऱ्या हाफमध्येही भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. ३३ व्या मिनिटाला सुनेलिता टोप्पोने भारतासाठी पाचवा गोल केला. त्यानंतर ५२ व्या मिनिटाला मलेशियाच्या झुल्किफ्लीने गोल करुन कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. परंतु, ५७ व्या मिनिटाला इशिकाने भारताचा सहावा गोल करून विजय निश्चित केला. अशाप्रकारे, भारतीय संघाने मलेशियाला ६-२ ने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम सामन्यात भारत- चीन भिडणार

भारताने सहाव्यांदा महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी भारतीय संघाने २०१६, २०२३ आणि २०२४ मध्ये विजेतेपद पटकावले होते. संघासाठी चौथ्यांदा चॅम्पियन बनण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.

आता भारतीय संघ २८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात चीनचा सामना करेल आणि आपले चौथे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपद पटकावण्याचे त्यांचे ध्येय असेल. दुसऱ्या उपांत्य सामन्यात जपानला १-० ने पराभूत करून चीनने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता, अंतिम सामन्यात चीन आणि भारतामध्ये अटीतटीची लढत अपेक्षित आहे.

Good Sleep Tips: रात्री चांगली झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी करा 'या' ५ गोष्टी; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Blinkit App Privacy Controversy: तुमच्या फोनमधील अ‍ॅप्सवर Blinkit ची नजर? बॅटरी आणि Wi-Fi बाबतही मोठा दावा!

आता 112 प्रकारचे आजार, शस्त्रक्रियांवर सरकारी रुग्णालयांत उपचार; मात्र डॉक्टरांअभावी उपचाराचा प्रश्न

Crime News: नवरा आहे की राक्षस! पत्नीला बेशुद्ध करून 3 वर्षे अनोळखी पुरुषांकडून बलात्कार, व्हिडिओ बनवून ...; ६० हून अधिक गुन्ह्यांची कबुली

Reserve Bank Repo Rate : कर्जदारांना फटका बसणार? RBI पुन्हा रेपो रेट वाढवणार? EMI आणि कर्जावर काय होणार परिणाम?