Kabaddi Tournament : अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी स्पर्धेत; स्पर्श फाउंडेशन, स्वस्तिक मंडळाची विजयी आगेकूच 
Sports

Kabaddi Tournament : अजिंक्यपद कबड्डी निवड चाचणी स्पर्धेत; स्पर्श फाउंडेशन, स्वस्तिक मंडळाची विजयी आगेकूच

मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या 44 व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत स्पर्श फाउंडेशन, स्वस्तिक मंडळ, पार्ले महोत्सव स्पोर्ट्स, टागोरनगर मित्र मंडळ आणि श्री सिद्धिविनायक यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत चौथ्या फेरीत प्रवेश केला.

Rakesh Khedekar
  • पार्ले महोत्सव, टागोरनगर, श्री सिद्धिविनायकही चौथ्या फेरीत

  • स्वस्तिकचा दणदणीत विजय

  • श्री सिद्धिविनायकचा एकतर्फी विजय

Kabaddi Tournament : मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या वतीने सुधीर मोरे मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 44 व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत प्रथम श्रेणी पुरुष गटात स्पर्श फाउंडेशन, स्वस्तिक मंडळ, पार्ले महोत्सव स्पोर्ट्स, टागोरनगर मित्र मंडळ आणि श्री सिद्धिविनायक यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला. पार्कसाइट, विक्रोळी पश्चिम येथील महापालिका मैदानावर रंगलेल्या तिसऱ्या फेरीच्या सामन्यांत संघांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले.

स्पर्श फाउंडेशनने संघर्ष मंडळाचा 39-16 असा पराभव करत दिमाखात आगेकूच केली. मध्यंतराला 18-7 अशी आघाडी घेणाऱ्या स्पर्शने उत्तरार्धातही आक्रमक खेळ कायम ठेवला. अभिजित बाधवल आणि आकाश आरसूल यांनी विजयात मोलाचे योगदान दिले. संघर्षकडून मारुती आर. के. याने चांगला खेळ केला.

स्वस्तिकचा दणदणीत विजय

स्वस्तिक मंडळाने अमरज्योतला 25-17 असे नमविले. सुजल सावंत आणि प्रफुल्ल चव्हाण यांच्या चढाई व पकडीतील प्रभावी खेळामुळे स्वस्तिकने बाजी मारली. अमरज्योतकडून मयुरेश कोयंडे आणि सुधांशु सोळंकी यांनी चांगली झुंज दिली.

पार्ले महोत्सव स्पोर्ट्सने संकल्प प्रतिष्ठानवर 38-20 असा विजय मिळविला. मध्यंतराला 17-14 अशी आघाडी असलेल्या पार्ले महोत्सवने उत्तरार्धात खेळाचा वेग वाढवत सामना एकतर्फी केला. अक्षय तावडे आणि इरफान अन्सारी यांनी अष्टपैलू खेळ करत विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. संकल्पच्या प्रथमेश मोरेची झुंज मात्र अपुरी ठरली.

टागोरनगर मित्र मंडळाने श्री सिद्धीच्या संघाचा 32-19 असा पराभव केला. सनीला शिंदे आणि अक्षय देशमुख यांनी चढाई-पकडीमध्ये उत्कृष्ट खेळ केला. श्री सिद्धीकडून संजित पंडित याने चांगली लढत दिली.

श्री सिद्धिविनायकचा एकतर्फी विजय

दुसरीकडे, श्री सिद्धिविनायकने मुलुंड क्रीडा केंद्राचा 50-19 असा धुव्वा उडविला. ओम कुदळे आणि सुजल गुप्ता यांच्या आक्रमक खेळाच्या जोरावर सिद्धिविनायकने मध्यंतराला 25-11 अशी आघाडी घेतली. उत्तरार्धातही 25 गुणांची भर घालत संघाने अर्धशतक पूर्ण केले. मुलुंडकडून रोहित राठोडने प्रतिकार केला.

अन्य सामन्यात शूर जवान कबड्डी संघाने निखिल चव्हाण आणि साहिल प्रत्यने यांच्या प्रभावी खेळाच्या जोरावर श्री सिद्धी क्रीडा मंडळावर 31-24 असा विजय मिळविला. श्री सिद्धीकडून रोहित सिंग आणि तुषार कांबळी यांनी कडवी झुंज दिली.

बोरांसाठी चिमुरडीवर क्रूरतेचा कळस! सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची चक्रे फिरली...

जुन्या WhatsApp DP ला म्हणा बाय-बाय! AI बनवणार तुमचा नवा स्टायलिश लूक

Deepak Kejriwal: कॅन्सरशी झुंज देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण? CINTAA कार्यालयातील घटनेने खळबळ

FUEL Social Stock Exchange: ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी! 'फ्युएल'च्या माध्यमातून शिष्यवृत्ती आणि मोफत MBA ची घोषणा

चक दे इंडिया! भारताच्या वाघिणींचा 'विजयी चौकार'; चीनला लोळवत चौथ्यांदा पटकावला Asian Champions Trophy चा किताब