क्राइस्टचर्चमध्ये यशस्वीचा ऐतिहासिक पराक्रम
सचिन तेंडुलकरही मागे पडला
३३ वेगवेगळ्या मैदानांवर खेळण्याचा रचला इतिहास
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात, टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या किवी संघाची सुरुवात खराब झाली.
भारतीय गोलंदाजांनी अवघ्या ११० धावांवर तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. परंतु,यानंतर किवी फलंदाजांनी डाव सावरला. मात्र, या सामन्यात, भारतीय संघाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने सामन्यात एकही चेंडू न खेळता एक नवीन विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. यासोबतच त्याने सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे.
यशस्वी जैस्वालने १२ जुलै २०२० रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. तेव्हापासून तो संघाचा एक नियमित सदस्य आहे. क्राइस्टचर्च येथे न्यूझीलंडविरुद्धचा सामना हा त्याचा ३३ वा सामना आहे. विशेष म्हणजे, त्याने आतापर्यंत वेगवेगळ्या मैदानांवर ३३ कसोटी सामने खेळले आहेत. पदार्पणापासून वेगवेगळ्या मैदानांवर सर्वाधिक सामने खेळण्याच्या बाबतीत त्याने आता संजय मांजरेकरची बरोबरी केली आहे.
मांजरेकरने आपले पहिले ३३ सामने वेगवेगळ्या मैदानांवर खेळले होते. तसेच, या बाबतील जैस्वालने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. सचिनने १९८९ मध्ये पदार्पण केल्यापासून वेगवेगळ्या मैदानांवर ३२ सामने खेळले होते. त्याच्यापाठोपाठ माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ आहेत. त्यांनी देखील आपले पहिले २४ कसोटी सामने वेगवेगळ्या मैदानांवर खेळले होते.
भारत २०२७ च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला सामना २१ जानेवारी रोजी नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. जैस्वालने या स्टेडियमवर अद्याप एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे, जैस्वाल विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये पाऊल ठेवताच तो मांजरेकरलाही मागे टाकेल.
संजय मांजरेकर (भारत) - ३३ कसोटी
यशस्वी जैस्वाल (भारत) - ३३* कसोटी
सचिन तेंडुलकर (भारत) - ३२ कसोटी
जवागल श्रीनाथ (भारत) - २४ कसोटी
दिनेश रामदिन (वेस्ट इंडीज) - २४ कसोटी सामने