मायक्रोसॉफ्ट सर्विस मॅनेजमेंट आणि इंजीनियरिंग सिस्टिमबाबत अनेक प्रश्न उपस्थित
इंजीनियरिंग आणि सर्विस रिकवरी सिस्टिममध्ये बदल करण्यासाठी कोड रेड मोहिम
कोड रेड ही मायक्रोसॉफ्टची एक हाय-प्रायोरिटी मोहिम
अलीकडेच झालेल्या मायक्रोसॉफ्ट आऊटेजनंतर कंपनीच्या सर्विस मॅनेजमेंट आणि इंजीनियरिंग सिस्टिमबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. ही आऊटेज समस्या तब्बल 20 तासांनी सोडवण्यात आली. मात्र या काळात जगभरातील अनेक महत्त्वाच्या डिजीटल सेवांवर परिणाम झाला. या आऊटेजचा परिणाम सामान्य यूजर्सवर झालाच. मात्र यासोबतच सरकारी एजेंसी, ट्रेडिंग कंपन्या आणि एयरलाइन कम्युनिकेशनच्या सर्विसवर देखील परिणाम होत असल्याचे पाहायला मिळाले. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता मायक्रोसॉफ्टने त्यांच्या त्रुटी दूर करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने त्यांच्या इंजीनियरिंग आणि सर्विस रिकवरी सिस्टिममध्ये बदल करण्यासाठी कोड रेड (Code Red) मोहिम सुरु केली आहे.
कंपनीने सुरु केलेल्या या मोहिमेअंतर्गत भविष्यात अशा समस्या दूर करण्यासाठी आणि सेवा पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी त्वरित काम केले जाणार आहे. कोड रेड अभियान नक्की काय आहे आणि याअंतर्गत कंपनी कशा पद्धतीने काम करणार आहे, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य: Pinterest)
कोड रेड ही मायक्रोसॉफ्टची एक हाय-प्रायोरिटी मोहिम आहे. नुकत्याच झालेल्या मोठ्या सर्विस आऊटेजनंतर कंपनीने त्यांच्या इंजीनियरिंग आणि ऑपरेशनल त्रुटी दूर करण्यासाठी या मोहिमेची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत कंपनीद्वारे त्यांची सिस्टिम अधिक मजबूत करण्यासाठी, सर्विसमध्ये येणाऱ्या तांत्रिक समस्या त्वरित ओळखण्यासाठी आणि आऊटेजची समस्या निर्माण झाल्यास रिकव्हरी प्रक्रिया अधिक वेगाने सुरु करण्यासाठी काम केले जाणार आहे. यामध्ये सर्वरवरील वाढता भार संभाळणं, इंटरनेट ट्रॅफिकचे विविध क्षेत्रांमध्ये वितरण करणे आणि एआय एजेंटच्या मदतीने सिस्टिमवर देखरेख ठेवणे यांचा समावेश आहे.
एखाद्या मोठ्या तांत्रिक आऊटेजनंतर सेवा पुन्हा लवकरात लवकर पूर्वपदावर कशा येतील, यावर मायक्रोसॉफ्ट सध्या काम करत आहे. भविष्यात आऊटेजची समस्या निर्माण झाल्यास जगभरात केवळ एक तासात सेवा पुन्हा पूर्वपदावर सुरु करता याव्यात, यावर सध्या कंपनीचा फोकस आहे. याव्यतिरिक्त कंपनी महत्त्वाचे सॉफ्टवेयर अपडेट आणि सिक्योरिटी फिक्स देखील वेगाने लागू करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, 12 आणि 13 नोव्हेंबर रोजी जगभरातील यूजर्सना मायक्रोसॉफ्ट आऊटेजचा सामना करावा लागला होता. यावेळी एक्सचेंज ऑनलाइन, आउटलुक, टीम्स, कोपायलट AI असिस्टेंट आणि माइक्रोसॉफ्ट 365 च्या दुसऱ्या सेवांवर परिणाम झाला होता. तसेच, ऑस्ट्रेलिया, जापान आणि अमेरिकेसह विविध देशांतील सरकारी एजेंसींना देखील या आऊटेजचा सामना करावा लागला होता.