angladesh News : ढाक्याच्या राजकारणात खळबळ; भारताला मुस्लिमविरोधी म्हणत बांगलादेशी सभापती हाफिज उद्दीन अहमद यांची टीका  ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
World

Bangladesh News : ढाक्याच्या राजकारणात खळबळ; भारताला मुस्लिमविरोधी म्हणत बांगलादेशी सभापती हाफिज उद्दीन अहमद यांची टीका

Bangladesh News : हाफिजुद्दीन अहमद सध्या पाकिस्तान दौऱ्यावर असून, तिथे त्यांनी भारताविषयी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. अहमद यांनी इस्लामाबादमध्ये म्हटले की, भारत बंगाली लोकांना मदत करण्यासाठी १९७१ च्या युद्धात सामील झाला नव्हता.

हर्षदा पाटोळे
  1. १९७१ च्या युद्धावर वादग्रस्त वक्तव्य

  2. काश्मीर आणि भारतावर टीका

  3. मुक्तिसंग्रामातील पार्श्वभूमी

दक्षिण आशियातील राजकारणात पुन्हा एकदा नवा वाद पेटला आहे. बांगलादेशातील (Bangladesh) सत्तांतरानंतर ढाका आणि इस्लामाबाद यांच्यातील संबंधांमध्ये बदल होत असल्याची चर्चा असतानाच, बांगलादेश संसदेचे सभापती हाफिज उद्दीन अहमद यांच्या पाकिस्तान दौऱ्यातील वक्तव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इस्लामाबादमध्ये बोलताना त्यांनी १९७१ च्या बांगलादेश स्वातंत्र्ययुद्धातील भारताच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्या भारताने १९७१ च्या युद्धात लाखो निर्वासितांना आश्रय दिला आणि बांगलादेशच्या निर्मितीमध्ये निर्णायक भूमिका बजावली, त्याच भारताविषयी अहमद यांनी केलेल्या विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

हाफिज उद्दीन अहमद यांनी म्हटले की, १९७१ च्या युद्धात भारत बंगाली लोकांना मदत करण्यासाठी सामील झाला नव्हता, तर केवळ पाकिस्तानला कमकुवत करण्याचा त्याचा हेतू होता. त्यांचे हे वक्तव्य केवळ ऐतिहासिक वादापुरते मर्यादित राहिलेले नाही, तर सध्याच्या भू-राजकीय समीकरणांशीही जोडले जात आहे. विशेष म्हणजे, हाफिज उद्दीन हे स्वतः १९७१ च्या मुक्तिसंग्रामात पाकिस्तानविरुद्ध लढलेले सेनानी आहेत. त्यामुळे त्यांच्या तोंडून आलेली ही विधाने अधिकच चर्चेचा विषय ठरली आहेत.

काश्मीर प्रश्नावर पाकिस्तानची री आणि भारतावर टीका

पाकिस्तानच्या भूमीवरून बोलताना हाफिज उद्दीन अहमद यांनी काश्मीर वादावर पाकिस्तानच्या भूमिकेचे उघडपणे समर्थन केले. काश्मीरचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार सोडवला जाणे आवश्यक आहे, असा सूर त्यांनी आळवला. आंतरराष्ट्रीय मंचावर किंवा शेजारील देशात जाऊन काश्मीरसारख्या संवेदनशील मुद्द्यावर बांगलादेशच्या वरिष्ठ नेत्याने घेतलेली ही भूमिका भारतासाठी आणि प्रादेशिक संतुलनासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

इतकेच नाही तर, त्यांनी भारताला मुस्लिमविरोधी देश संबोधत तीव्र टीका केली. कोणाचेही थेट नाव न घेता त्यांनी असा दावा केला की, गेल्या १५ वर्षांत बांगलादेश एका शेजारी देशाची वसाहत बनल्यासारखी स्थिती होती. त्यांच्या या विधानाचा रोख भारताकडे असल्याचे स्पष्टपणे जाणवते. बांगलादेशातील मागील राजकीय कालखंडावर भाष्य करताना त्यांनी सार्वभौमत्व आणि स्वायत्ततेचा मुद्दा पुढे आणला. या संपूर्ण विधानांमधून ढाका आणि इस्लामाबाद यांच्यात वाढत चाललेली जवळीक अधिक स्पष्ट होत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

कोण आहेत हाफिज उद्दीन अहमद?

हाफिज उद्दीन अहमद हे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे (BNP) एक ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी लष्करात सेवा बजावली होती. १९७१ च्या युद्धकाळात ते पाकिस्तानी सैन्याचा भाग होते आणि त्यांनी पाकिस्तान मिलिटरी अकादमीमधून लष्करी प्रशिक्षण घेतले होते. त्या काळात बांगलादेश हा 'पूर्व पाकिस्तान' म्हणून ओळखला जात होता.

१९७१ मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी मुक्तिसंग्राम सुरू झाला, तेव्हा हाफिज उद्दीन अहमद अवघे २७ वर्षांचे तरुण होते. लष्करी पार्श्वभूमी असूनही त्यांनी तत्कालीन परिस्थितीत घेतलेला निर्णय त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा टप्पा ठरला. एकीकडे लष्करी शिस्त आणि दुसरीकडे आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याची ओढ, अशा कठीण वळणावर त्यांनी बंडाचा मार्ग निवडला.

पाकिस्तानी सैन्याविरुद्ध बंड आणि 'बीर बिक्रम' सन्मान

१९७१ मध्ये हाफिज उद्दीन अहमद यांची जेस्सोर छावणीतील ईस्ट बंगाल रेजिमेंटच्या पहिल्या बटालियनमध्ये नेमणूक झाली होती. १६ डिसेंबर २०२५ रोजी 'प्रथम आलो' या बांगलादेशी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या त्या काळातील आठवणींना उजाळा दिला होता. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, काही विचारविनिमयानंतर त्यांनी बंडात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि त्या वेळी ते २७ वर्षांचे होते.

अहमद सुमारे २०० सैनिकांसह या बंडात सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी मुक्तिसंग्राम संघटित करण्यास महत्त्वाची मदत केली. पाकिस्तानी सैन्याविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांना मुक्तिसंग्रामात भरती करून घेतले. स्वातंत्र्ययुद्धातील या धाडसी आणि महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना बांगलादेशच्या सर्वोच्च शौर्य पुरस्कारांपैकी एक असलेल्या 'बीर बिक्रम'ने सन्मानित करण्यात आले. आजही ते 'हाफिज उद्दीन अहमद "बीर बिक्रम"' म्हणून ओळखले जातात.

आज ज्यांच्या नावामागे 'बीर बिक्रम' हा शौर्य सन्मान जोडलेला आहे, त्याच नेत्याने पाकिस्तानात जाऊन भारताच्या भूमिकेवर केलेली टीका आणि काश्मीर प्रश्नावर घेतलेली भूमिका दक्षिण आशियातील राजकारणात अनेक नवे प्रश्न उपस्थित करत आहे. येत्या काळात या विधानांचे पडसाद राजनैतिक आणि राजकीय पातळीवर कसे उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हाफिज उद्दीन अहमद यांनी १९७१ च्या युद्धाबाबत काय वक्तव्य केले?

इस्लामाबादमध्ये बोलताना त्यांनी दावा केला की, १९७१ मध्ये भारत बंगाली लोकांना मदत करण्यासाठी युद्धात सामील झाला नव्हता, तर पाकिस्तानला कमकुवत करण्यासाठी सहभागी झाला होता.

हाफिज उद्दीन अहमद यांना 'बीर बिक्रम' पुरस्कार का मिळाला?

१९७१ च्या मुक्तिसंग्रामात पाकिस्तानी सैन्याविरुद्ध बंड करून लढा दिल्याबद्दल आणि विद्यार्थ्यांना संघटित केल्याबद्दल त्यांना 'बीर बिक्रम' या शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

काश्मीर मुद्द्यावर हाफिज उद्दीन अहमद यांनी कोणती भूमिका घेतली?

त्यांनी काश्मीर वादावर पाकिस्तानच्या भूमिकेचे समर्थन करत हा प्रश्न संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांनुसार सोडवला जावा, असे म्हटले.

Political News : 'संदीप देशपांडेंच्या व्हिडिओची फॉरेन्सिक तपासणी करा...'; निलेश राणेंची मागणी

JEE Main 2027 चा फॉर्म भरताना चूक झाली? आता करता येणार दुरुस्ती!

Best Tax Saving Investment : पैसेही वाढणार अन् इन्कम टॅक्सही वाचणार! या स्कीम्स देतात डबल फायदा

Chandrapur News: धान कापणी संपताच शेतमजुरांवर बेरोजगारीचे संकट; मिरची तोडणीसाठी तेलंगणात धाव

Gymnastics National Championship : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राची ताकद; प्रसाद सालापची चार सुवर्णपदकांना गवसणी