केस ४००० मध्ये पुरावे कुमकुवत; लाचखोरीच्या आरोप मागे घेण्याची सूचना
दुसऱ्या प्रकरणातही न्यायालयाचे प्रश्न
अंतिम निर्णय सरकारी वकिलाकडे
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासाठी भ्रष्टाचार प्रकरणात दिलासादायक घडामोड समोर आली आहे . त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या सर्वात गंभीर आरोपांपैकी काही आरोप काढून टाकण्याची शिफारस इस्रायली न्यायाधीशांनी केल्याचे समोर आले आहे .
या घडामोडीमुळे दीर्घकाळापासून सुरु असलेल्या कायदेशीर लढाईत नेतन्याहू यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे . मात्र आरोप मागे घेण्याची शिफारस म्हणजे न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे . असा याचा अर्थ होत नाही . या प्रकरणातील अंतिम निर्णय आणि पुढील न्यायालयातील प्रक्रिया महत्वाची ठरणार आहे .
नेतन्याहू यांच्यावरील सर्वात गंभीर प्रकरण केस ४००० म्हणून ओळखले जाते . या प्रकरणात त्यांनी दूरसंचार क्षेत्रातील कंपनी बेझेकला सुमारे १.८ अब्ज शेकेलचे नियामक फायदे मिळवून दिल्याचा आरोप आहे . त्याबदल्यात त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या बाजूने एका वृत्तसंस्थेवर सकारात्मक बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी दबाव टाकल्याचा दावा करण्यात आला होता .
मात्र न्यायाधीशांनी या प्रकरणातील पुराव्यांबाबत गंभीर शंका व्यक्त केल्या . खासकरून सरकारी साक्षीदारांच्या जबाबामध्ये विसंगती असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे . त्यामुळे या प्रकरणातील आरोप मागे घेण्याचा विचार करण्याची सूचना करण्यात आली आहे .
नेतन्याहू यांच्या विरोधात केस २००० नावाचे आणखी एक प्रकरण सुरु आहे . यामध्ये त्यांनी येडीओथ अहरोनोथ या वृत्तपत्रकाचे प्रकाशक अर्नोन मोझेस यांच्याशी सकारात्मक प्रसिद्धीच्या बदल्यात प्रतिस्पर्धी वृत्तपत्राला अडचणीत आणणारा कायदा करण्याबाबत चर्चा केल्याचा आरोप आहे . पण अशा चर्चेला गुन्हा म्हणता येईल का , याबाबत न्यायाधीशांनी प्रश्न निर्माण केले .
या प्रकरणातील आरोपांचा फेरविचार करण्याची सूचना न्यायालयाने केली आहे . दरम्यान केस १००० मध्ये श्रीमंत व्यावसायिकांकडून महागड्या भेटवस्तू स्वीकारल्याचा आरोप आहे . या प्रकरणाचा निकाल लवकर लावण्यासाठी दोन्ही बाजुंना तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा ,असेही न्यायालयाने सुचवले आहे .
न्यायालयाच्या या निरीक्षणानंतर नेतन्याहू यांनी समाधान व्यक्त केले आहे . त्यांनी या घडामोडीला सत्य आणि न्यायासाठी आशेचा किरण असे संबोधले . तसेच तपास यंत्रणांनी आपल्या जवळच्या लोकांवर दबाव टाकल्याच्या आरोपही केला . मात्र नेतन्याहू यांनी सर्व आरोप फेटाळले असून आपण निर्दोष असल्याची भूमिका कायम ठेवली आहे .
इस्रायलच्या अटर्नी जनरल गाली बहराव - मियारा यांनी न्यायालयाच्या सूचनांचा सरकारी वकिलांसोबत विचार केला जाईल , असे स्पष्ट केले आहे . खास बाब म्हणजे न्यायाधीशांच्या शिफारशी म्हणजे अंतिम निकाल नाही किंवा नेतन्याहू यांची निर्दोष मुक्तता नाही . त्यामुळे आता सरकारी वकिलांचा निर्णय आणि पुढील न्यायालयीन प्रक्रिया महत्वाची ठरणार आहे .