दिल्लीत पेंट फॅक्टरीत भीषण आग; 11 जणांचा होरपळून मृत्यू, अनेक जखमी!

दिल्ली अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अलीपूरच्या दयालपूर बाजारातील कारखान्याच्या परिसरात 11 जणांचे जळालेले मृतदेह सापडले आहेत.

    दिल्ली : गुरुवारी (15 फेब्रुवारी) संध्याकाळी दिल्लीच्या बाहेरील अलिपूर येथील एका पेंट फॅक्टरीला लागलेल्या आगीत किमान 11 जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी झाले (Delhi Fire In Paint Factory) आहेत. सध्या आग नियंत्रणात आली असून  जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयाच दाखल करण्यात आले आहे.

    नेमकं काय घडलं

    दिल्ली अग्निशमन सेवेच्या (डीएसएफ) अधिकाऱ्याने सांगितले की, अलीपूरच्या दयालपूर बाजारातील कारखान्याच्या परिसरात  ही आग लागली. या आगीची माहिती संध्याकाळी 5.25 वाजता मिळाली आणि अग्निशमन दलाच्या 22 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री नऊच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर कारखान्यात आग लागली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.”

    पोलीस तपास सुरू

    या कारखान्याचा वापर पेंट मटेरियल तयार करण्यासाठी होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप समजले नसून पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, श्यामू कुमार नावाच्या व्यक्तीने सांगितले की, त्याचा १९ वर्षांचा भाऊ शुभम कारखान्यात काम करायचा. ती म्हणाली “माझा भाऊ कुठे आहे हे मला माहीत नाही. तो नुकताच कारखान्यात रुजू झाला होता. तो इतर अनेकांसह बेपत्ता आहे. अनेकांचा मृत्यू होण्याची भीती आहे”.या कारखान्यात मोठ्या प्रमाणावर कर्मचारी काम करत होते.