फोटो सौजन्य - Social Media
अमेरिकेतील आघाडीची इलेक्ट्रिक कार निर्माता टेस्ला भारतात आपली पावले झपाट्याने पुढे टाकत आहे. दिल्ली आणि मुंबई येथे शोरूम सुरू केल्यानंतर कंपनी आता देशातील अनेक मोठ्या शहरांत सुपरचार्जिंग नेटवर्क उभारण्याच्या तयारीत आहे. नुकताच भारतात औपचारिक प्रवेश करताना टेस्लाने आपली प्रीमियम इलेक्ट्रिक SUV Model Y लाँच केली असून, या गाडीची किंमत ₹५९.८९ लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.
बुकिंग काही आठवड्यांपूर्वीच सुरू झाले असून सप्टेंबर २०२५ पासून डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता आहे. तथापि, ग्राहकांना अधिक सोय मिळावी यासाठी कंपनी प्रथम चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर लक्ष केंद्रित करत आहे. दिल्ली एरोसिटी येथील दुसऱ्या एक्स्पिरियन्स सेंटरच्या उद्घाटनावेळी टेस्लाची रीजनल डायरेक्टर (साऊथ ईस्ट आशिया) इसाबेल फॅन यांनी सांगितले की दिल्ली आणि मुंबई या कंपनीच्या प्राधान्यक्रमात सर्वात वर आहेत.
काही आठवड्यांत गुरुग्राममध्ये पहिले सुपरचार्जिंग स्टेशन सुरू होईल, त्यानंतर दक्षिण दिल्लीतील साकेत आणि नोएडातही सुविधा उपलब्ध होईल. मुंबईत लोअर परळ, नवी मुंबई आणि ठाणे येथे नवीन सुपरचार्जिंग पॉइंट बसवले जातील, जे विद्यमान बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) लोकेशनव्यतिरिक्त असतील. तसेच कंपनी लवकरच बेंगळुरूसारख्या नवीन बाजारपेठेतही प्रवेश करणार आहे. चार्जिंग नेटवर्क वाढवण्यासोबतच टेस्ला भारतात मोबाइल सर्व्हिस, रिमोट डायग्नॉस्टिक्स, डेडिकेटेड सर्व्हिस सेंटर आणि टेस्ला अप्रूव्ह्ड कोलिजन सेंटर सुरू करण्याची योजना आखत आहे.
सध्याच्या ऑर्डरनुसार रिअर-व्हील ड्राइव्ह (RWD) व्हेरिएंटची डिलिव्हरी २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत, तर लाँग रेंज RWD व्हेरिएंटची डिलिव्हरी चौथ्या तिमाहीत होईल. ऑर्डर टेस्लाच्या अधिकृत इंडिया वेबसाइटवर ऑनलाइन देता येईल आणि बुकिंगसाठी ₹२२,२२० चे डिपॉझिट व ₹५०,००० चे प्रशासन व सेवा शुल्क भरावे लागेल. RWD व्हेरिएंटची किंमत ₹५९.८९ लाख तर लाँग रेंज RWD व्हेरिएंटची किंमत ₹६७.८९ लाख (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे.
जरी Model Y ची बुकिंग संपूर्ण भारतात सुरू असली तरी सुरुवातीला डिलिव्हरी मुंबई, पुणे, दिल्ली आणि गुरुग्राम येथेच दिली जाईल. मजबूत चार्जिंग आणि सर्व्हिस नेटवर्कमुळे भारतीय इलेक्ट्रिक वाहन बाजारात नवा वेग आणण्याचा टेस्लाचा निर्धार आहे.