फोटो सौजन्य: iStock
ड्रीम कार खरेदी करणे हे अनेकांचे स्वप्न असते. नवीन कार घेतल्यावर बरेच जण तिची काळजी घेतात, वेळेवर सर्व्हिस करतात. पण जसजशी कार जुनी होते, तसतसे तिच्याकडे दुर्लक्ष होऊ लागते. हे दुर्लक्ष कारच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकते. विशेषतः उन्हाळा किंवा पावसाळा यांसारख्या हवामानात कारची अधिक काळजी घेणे गरजेचे असते. उष्णतेमुळे इंजिन गरम होऊ शकते, तर पावसामुळे इलेक्ट्रिकल सिस्टीम आणि ब्रेकवर परिणाम होऊ शकतो. म्हणून नियमित देखभाल, टायर प्रेशर तपासणी, ब्रेक ऑइल, वायपर आणि एसी सिस्टमची तपासणी करणे अत्यावश्यक आहे. त्यासोबतच काही चुका टाळणे देखील महत्वाचे आहे.
उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेता तशीच तुम्हाला तुमच्या कारचीही काळजी घ्यावी लागेल. मात्र, कधीकधी लोक काही लहान चुका करतात ज्यामुळे कारचे मोठे नुकसान होऊ शकते. तसेच कारला आग लागण्याचा धोकाही वाढतो. हीच बाब लक्षात घेऊन, आज आपण अशा चार चुकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंगच्या सवयींमधून काढून टाकल्या पाहिजेत.
कारची वायरिंग खूप नाजूक असते. जर वायरिंग योग्यरित्या केली नाही तर ती कापले जाऊ शकते, ज्यामुळे कारमध्ये शॉर्ट सर्किट होण्याचा धोका वाढतो. या शॉर्ट सर्किटमुळे कारमध्ये आग लागण्याची शक्यता वाढते. म्हणून, वायरिंगचे काम नेहमी अनुभवी मेकॅनिककडूनच करून घ्यावे.
उन्हाळ्यात, कारचे इंजिन इतर ऋतूंपेक्षा खूप वेगाने गरम होते. इंजिन जास्त गरम झाल्यामुळे, इंजिनच्या पार्ट्सना नुकसान होण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे आग देखील लागू शकते. म्हणून, कारचे रेडिएटर, कूलंट आणि फॅन नियमितपणे तपासा.
तुमच्या कारमध्ये जास्त परफ्यूम, डिओडोरंट स्प्रे किंवा कोणतेही गॅसयुक्त प्रॉडक्ट ठेवणे टाळा. खरंतर या गोष्टी ज्वलनशील असतात, ज्यामुळे कारला आग लागू शकते. यासोबतच, कारमध्ये स्वस्त किंवा लोकल अॅक्सेसरीज बसवणे टाळा, यामुळे कारला आग लागण्याची शक्यता देखील वाढते.
कारमध्ये प्लास्टिकच्या बाटल्या किंवा कोणत्याही ट्रान्सपरंट वस्तू ठेवणे टाळा. जर सूर्यप्रकाश त्यांच्यावर पडला तर लेन्सच्या परिणामामुळे आग लागू शकते. कारच्या सीटवर प्लास्टिक पॉलिथिन ठेवल्याने केबिनमध्ये उष्णता वाढू शकते, ज्यामुळे धोका वाढू शकतो. याशिवाय, कारमध्ये लायटर देखील ठेवू नये.