कारची बाह्य स्वच्छता जितकी महत्त्वाची आहे, तितकीच तिच्या अंतर्गत भागांची काळजी घेणेही गरजेचे आहे. कार सुरळीत चालण्यासाठी आणि तिच्या इंजिनचे आयुष्य वाढवण्यासाठी विविध प्रकारची ‘ड्रायव्हिंग ऑइल्स’ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. जर ही ऑइल्स वेळेवर बदलली नाहीत, तर गाडीचे मोठे नुकसान होऊ शकते आणि तुम्हाला हजारो रुपयांचा फटका बसू शकतो. जाणून घेऊया अशाच ५ महत्त्वाच्या ऑइल्सबद्दल,
१. इंजिन ऑइल
हे कारमधील सर्वात महत्त्वाचे ऑइल आहे. ते इंजिनच्या अंतर्गत भागांमधील घर्षण कमी करते आणि इंजिन थंड ठेवण्यास मदत करते. जुने किंवा खराब झालेले इंजिन ऑइल काळे आणि घट्ट होते. यामुळे इंजिनचे भाग एकमेकांवर घासून इंजिन ‘सीझ’ होऊ शकते, ज्याचा दुरुस्ती खर्च खूप मोठा असतो.
कार सर्व्हिसिंगमध्ये नक्की काय काय केले जाते? जाणून घ्या संपूर्ण माहिती
२. गियर ऑइल किंवा ट्रान्समिशन फ्लूइड
कार मॅन्युअल असो वा ऑटोमॅटिक, गियर बदलण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी गियर ऑइलची आवश्यकता असते. ते गियरबॉक्समधील घटकांना गंजण्यापासून आणि झिजण्यापासून वाचवते. गियर ऑइल कमी झाल्यास गियर कडक होतात आणि ते बदलताना मोठा आवाज येतो. जास्त दुर्लक्ष केल्यास पूर्ण गियरबॉक्स बदलावा लागू शकतो.
३. ब्रेक ऑइल
तुमच्या सुरक्षेसाठी ब्रेक ऑइल सर्वात महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही ब्रेक पॅडल दाबता, तेव्हा या ऑइलच्या हायड्रोलिक प्रेशरमुळेच गाडीचे ब्रेक लागतात. ब्रेक ऑइल हवेतील ओलावा शोषून घेते. यामुळे ब्रेक लावण्याची क्षमता मंदावते किंवा ऐन वेळी ब्रेक फेल होण्याचा धोका निर्माण होतो.
रिक्षा गॅसवर नक्की कशी चालते? आणि ड्रायव्हर सीटशेजारील ‘स्टार्टिंग लिव्हर’चा गेम काय असतो?
४. पॉवर स्टिअरिंग फ्लूइड
आजकालच्या बहुतांश गाड्यांमध्ये हायड्रोलिक पॉवर स्टिअरिंग असते. हे ऑइल स्टिअरिंग फिरवणे सोपे आणि हलके करते. हे ऑइल कमी झाल्यास किंवा खराब झाल्यास स्टिअरिंग फिरवताना ते खूप जड होते आणि वळण घेताना गाडीतून विचित्र आवाज येऊ लागतो.
५. कूलंट
थेट ऑइल नसले तरी हे द्रव इंजिनचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ते इंजिनला ओव्हरहीट होण्यापासून वाचवते. कूलंट संपल्यास किंवा जुने झाल्यास इंजिन ब्लॉक होऊन गाडी रस्त्यातच बंद पडू शकते.
प्रत्येक कारच्या मॅन्युअल पुस्तिकेत ही ऑइल्स कधी बदलावीत, याची निश्चित मर्यादा किलोमीटर किंवा महिने दिलेली असते. त्यानुसार नियमित कार सर्व्हिसिंग दरम्यान ही ऑइल्स तपासून आणि बदलून घेणे हाच सुरक्षित प्रवासाचा उत्तम मार्ग आहे.






