मुंबईत लवकरच सुरु होणार e-Bike Taxi सर्व्हिस (फोटो सौजन्य: iStock)
मुंबई म्हणजे संपूर्ण देशाचं हृदयच. फक्त महाराष्ट्रातून नाही तर संपूर्ण देशातून कित्येक जण आपले स्वप्न घेऊन या मायानगरीत येत असतात. यामुळेच तर या शहरात झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे. परिणामी लोकलमध्ये गर्दी, मेट्रोमध्ये गर्दी आणि रस्त्यावरून चालताना देखील गर्दीचा सामना करावा लागत आहे. त्यात, विविध विकास कामांमुळे देखील मुंबईत ट्राफिक जाम होत असते. मात्र, आता मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे.
राज्य सरकारने घोषणा केली आहे की या महिन्याच्या अखेरीस मुंबईत ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू होतील. प्रवाशांना परवडणारी, पर्यावरणपूरक आणि फास्ट प्रवास प्रदान करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. ही सेवा Ola, Uber आणि Rapido संयुक्तपणे चालवतील.
सरकारने ई-बाईक टॅक्सीचे भाडे अतिशय परवडणारे ठेवले आहे. पहिल्या 1.5 किलोमीटरचे भाडे 15 रुपये निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर, प्रवाशांना प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठी फक्त 10.27 रुपये द्यावे लागतील. हे भाडे ऑटो-रिक्षा आणि टॅक्सींपेक्षा खूपच स्वस्त आहे. दररोज प्रवास करणारे, ऑफिसमध्ये जाणारे आणि सामान्य जनतेला याचा थेट फायदा होईल.
सध्या, ओला, उबर आणि रॅपिडो या तीन कंपन्यांना ई-बाईक टॅक्सी सेवा चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. या कंपन्यांना तात्पुरते परवाने मिळाले आहेत आणि त्यांना पुढील 30 दिवसांत कायमस्वरूपी परवाने मिळवावे लागतील. त्यानंतर, मुंबईत ही सेवा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल.
ही नवीन सेवा सुरक्षित आणि विश्वासार्ह असावी यासाठी सरकारने काही नियम निश्चित केले आहेत. प्रत्येक कंपनीकडे किमान 50 ई-बाईक असणे आवश्यक आहे. रायडर्स 20 ते 50 वर्षांच्या दरम्यान असले पाहिजेत आणि त्यांच्याकडे व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. सर्व ई-बाईक टॅक्सी पिवळ्या रंगाच्या असतील आणि त्यांचा कमाल वेग ताशी 60 किमी निश्चित करण्यात आला आहे. रायडर्सना दोन पिवळे हेल्मेट बाळगावे लागतील. 12 वर्षांखालील मुलांना ही सेवा वापरण्याची परवानगी राहणार नाही. महिलांच्या सुरक्षिततेसाठी, महिला रायडरचा पर्याय देखील उपलब्ध असेल.
नवीन GST दरांच्या नावानं चांगभलं! ‘या’ 5 Compact SUV ची किंमत 1.50 लाख रुपयांनी स्वस्त
ई-बाईक टॅक्सी सर्व्हिसमुळे मुंबईतील लोकांना अनेक फायदे मिळेल. सर्वात मोठा फायदा म्हणजे वाहतूक कोंडीपासून सुटका, कारण ई-बाईक सहजपणे गर्दीच्या रस्त्यांवर प्रवास करू शकतात. आणखी एक फायदा म्हणजे कमी भाडे, ज्यामुळे दैनंदिन प्रवाशांचा खर्च कमी होईल. तिसरा फायदा म्हणजे प्रदूषण कमी होणे, कारण इलेक्ट्रिक बाइक्स धूर सोडत नाहीत.