फोटो सौजन्य - Social Media
सध्या भारतभर प्रचंड उकाडा जाणवतोय. तापमान काही ठिकाणी 45 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचलं आहे. अशा काळात माणसांप्रमाणेच आपल्या कारचीही काळजी घेणं अत्यावश्यक ठरतं. कारण तीव्र उष्णतेचा परिणाम कारच्या इंजिनपासून ते इंटेरियरवर होतो. योग्य काळजी न घेतल्यास कारचं नुकसान होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच उन्हाळ्यात कारची देखभाल करण्यासाठी हे 5 महत्वाचे उपाय अवश्य पाळा.
एसीची तपासणी करून घ्या
गर्मीच्या दिवसांत कारचा एअर कंडिशनर सतत वापरला जातो. जर तो व्यवस्थित काम करत नसेल, तर प्रवासात घामाघूम होण्याची वेळ येते. एसीमधून थंड हवा येत नसेल, दुर्गंधी जाणवत असेल किंवा कंप्रेसर नीट चालत नसेल, तर ताबडतोब मेकॅनिककडून तपासणी करून घ्या. याशिवाय, रेफ्रिजरंटची पातळी देखील नीट आहे की नाही हे पहा. उन्हात उभी असलेली कार आतून 60 अंशांपर्यंत तापू शकते, म्हणून एसी नीट चालणं अत्यावश्यक आहे.
टायर प्रेशरचा नीट विचार करा
उन्हाळ्यात हवेमुळे टायरमधील दाब वाढतो. रस्त्याच्या उष्णतेमुळे टायर गरम होतात आणि आतील हवा फुगते. जुने किंवा झिजलेले टायर असतील तर त्यांचा स्फोट होण्याची शक्यता वाढते. म्हणून नियमितपणे टायरचा दाब तपासावा. शक्य असल्यास नायट्रोजन हवा भरवावी, कारण ती उष्णतेमुळे फारशी फुगत नाही आणि प्रेशर नियंत्रणात राहतं.
कूलंटची पातळी नीट सांभाळा
इंजिन गरम होऊ नये यासाठी कूलंट अत्यंत गरजेचं असतं. उन्हाळ्यात इंजिन लवकर गरम होतं, त्यामुळे दर आठवड्याला एकदा तरी कूलंटची पातळी पाहणं आवश्यक आहे. जर पातळी कमी असेल, तर योग्य कूलंट किंवा डिस्टिल्ड वॉटर टाकावं. यामुळे इंजिनचं तापमान नियंत्रित राहतं आणि ओव्हरहिट होण्याची शक्यता कमी होते.
कारला वॅक्सिंग करा
जसं आपण त्वचेवर सनस्क्रीन लावतो, तसं कारलाही सूर्याच्या किरणांपासून वाचवण्यासाठी वैक्स पोलिश लावणं फायदेशीर ठरतं. हे कारच्या रंगाला दीर्घकाळ टिकवून ठेवतं आणि धूपामुळे होणाऱ्या नुकसानापासून कारच्या बाह्य भागाचं संरक्षण करतं. प्लास्टिकचे भाग – बंपर, क्लॅडिंग – हे उष्णतेमुळे वेगाने फिकट होतात, त्यामुळे प्लास्टिक पॉलिशही उपयोगी पडतं.
सनशेड, टिंट आणि कव्हरचा वापर करा
जर कार घराबाहेर पार्क करत असाल, तर ती थेट सूर्यप्रकाशातून वाचवण्यासाठी गाडीवर कव्हर घाला. हे पेंट आणि मेटलवर होणाऱ्या UV किरणांच्या दुष्परिणामांपासून संरक्षण करतं. याशिवाय, विंडशील्ड आणि साईड विंडोवर सनशेड वापरल्यास आतलं तापमान कमी राहतं. टिंटिंगही एक पर्याय आहे, पण भारतीय कायद्यानुसार टिंटची मर्यादा पाळणं आवश्यक आहे – पुढच्या आणि मागच्या काचांवर किमान 70% प्रकाश जाणं आवश्यक आहे, आणि साईड विंडोंसाठी 50%.