फोटो सौजन्य: @BBC_TopGear (X.com)
भारतीय मार्केटमध्ये बजेट फ्रेंडली कार्सच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात जरी वाढ होत असली तरी आजही लक्झरी कार्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळतात. देशात अनेक ठिकाणी रस्त्यांवर एखादी लक्झरी कार दिसली की अनेक जणांची नजर त्यावर रोखली जाते. तसेच अनेक जणांचे स्वप्न असते की आपल्याकडे लक्झरी कार असावी.
देशात अनेक उत्तम लक्झरी कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट परफॉर्मन्स देणाऱ्या लक्झरी कार ऑफर करतात. फेरारी ही त्यातीलच एक कंपनी. नुकतेच फेरारीने देशात एक आलिशान आणि हाय परफॉर्मन्स कार लाँच केली आहे, जिला पाहताच क्षणी तुम्ही तिच्या प्रेमात पडाल.
AC चालू ठेवायचा आणि मायलेजही कमी होऊ द्यायचं नसेल, तर कार ‘या’ स्पीडवर चालवा
फेरारीने भारतात त्यांची नवीन V12 पॉवर्ड सुपरकार 12 सिलिंड्री सादर केली आहे. ही कंपनीच्या सर्वात महत्त्वाच्या कारपैकी एक मानली जाते आणि त्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे तिचे नॅचरली एस्पिरेटेड 6.5-लिटर V12 इंजिन, जे टर्बोचार्ज केलेले नाही किंवा हायब्रिड नाही. आजच्या काळात ही एक अतिशय अनोखी गोष्ट आहे.
फेरारी 12 सिलिंड्रीमध्ये दिलेले इंजिन 820 बीएचपीची पॉवर जनरेट करते. त्याची रेडलाइन 9,500 आरपीएम आहे, ज्यामुळे ती हाय-रेव्हिंग युनिट बनते. ही सुपरकार 8-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येते आणि त्यात रियर-व्हील ड्राइव्ह सिस्टम आहे.
या कारच्या बोनेटमध्ये रिव्हर्स ओपनिंग डिझाइन आहे, जे तिला एक अनोखा लूक देते. याचे डिझाइन फेरारी डेटोना सारख्या जुन्या मॉडेल्सपासून प्रेरित आहे. त्यात ॲक्टिव्ह एरोडायनॅमिक्स, हलके मटेरिअल्स आणि बनावट ॲल्युमिनियम व्हील्स आहेत. समोरील काळी पट्टी ही एक खास डिझाइन एलिमेंट आहे, जी फक्त काळ्या रंगात उपलब्ध आहे.
Ferrari 12 Cilindri च्या इंटिरिअरमध्ये तीन डिजिटल स्क्रीन आहेत, ज्यामुळे ही आधुनिक आणि उच्च-तंत्रज्ञानाची कार बनते. या कारमध्ये दोन प्रवाशांसाठी पुरेशी जागा आहे आणि ती दैनंदिन वापरासाठी देखील वापरली जाऊ शकते. यामध्ये Apple CarPlay, Android Auto यासह अनेक प्रगत फीचर्स समाविष्ट आहेत. ग्राहक त्यांच्या आवडीनुसार ही कार कस्टमाइझ देखील करू शकतात.
Ferrari 12 Cilindri ची किंमत तिच्या कस्टम पर्यायांवर अवलंबून असते. भारतात, ही कार पूर्णपणे लोडेड व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. फेरारीसारख्या महागड्या कारच्या बाबतीत मागणी खूप जास्त असते आणि सप्लाय मर्यादित असतो, त्यामुळे किमतीपेक्षा उपलब्धता अधिक महत्त्वाची बनते. या आलिशान कारची किंमत 8.50 – 9.15 कोटी आहे.