फोटो सौजन्य: iStock
भारतात मोठ्या प्रमाणात कार्सची विक्री वाढताना दिसत आहे. यात विविध अनेक ऑटो कंपन्या वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये कार ऑफर करत असतात. देशात बजेट फ्रेंडली कार्सची विक्री जरी झपाट्याने वाढत असली तरी आजही लक्झरी सेगमेंट मधील कार्सना देखील उत्तम मागणी मिळते.
लक्झरी कार म्हंटलं की अनेकांच्या नजरेसमोर मर्सिडीज-बेंझचे नाव येते. अनेक नेते आणि बॉलीवूड सेलिब्रेटींच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज-बेंझच्या कारचा समावेश असतो. पण आता कंपनीने ग्राहकांना जोरदार झटका दिला आहे.
मर्सिडीज-बेंझ इंडियाने आपल्या कार्सच्या किमती वाढवण्याची घोषणा करून ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. ही वाढ सध्या सर्व मॉडेल्सवर लागू होईल आणि ती दोन टप्प्यात लागू केली जाणार आहे.
आता बिनधास्त बाईक खरेदी करा ! ‘ही’ कंपनी देतेय फ्री वॉरंटी आणि जबरदस्त कॅशबॅक
कंपनीने स्पष्ट केले आहे की या दरवाढीचा पहिला टप्पा 01 जून 2025 पासून आणि दुसरा टप्पा 01 सप्टेंबर 2025 पासून लागू होईल. या निर्णयानंतर, मर्सिडीज कार खरेदी करणाऱ्यांना 90,000 रुपये ते 12.20 लाख रुपयांपर्यंत किंमत मोजावी लागेल.
मर्सिडीजने सांगितले की, सर्व मॉडेल्सच्या किमती सरासरी 1.50 टक्क्यांनी वाढवल्या जातील. C-क्लास सारख्या एंट्री-लेव्हल लक्झरी कारसाठी सर्वात कमी किंमत वाढ ही 90,000 रुपये आहे. या वाढीनंतर, सी-क्लासची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत आता 60.3 लाख रुपये झाली आहे. त्याच वेळी, कंपनीच्या सर्वात प्रीमियम सेडान मर्सिडीज-मेबॅक एस-क्लासची किंमत जास्तीत जास्त 12.20 लाख रुपयांनी वाढली आहे. याची नवीन सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत आता 3.60 कोटी रुपये असेल. याशिवाय, GLE, GLS, EQB आणि E-क्लास सारख्या मर्सिडीजच्या इतर लोकप्रिय मॉडेल्सच्या किमतीही टप्प्याटप्प्याने वाढतील. याचा थेट परिणाम लक्झरी कार मार्केटमधील खरेदीदारांच्या खिशावर होणार आहे.
मर्सिडीज-बेंझ इंडियाचे मॅनेजिंग डिरेक्टर आणि सीईओ संतोष अय्यर म्हणाले की, या निर्णयामागील सर्वात मोठे कारण म्हणजे भारतीय रुपयाचे घसरत चाललेले मूल्य आणि वाढता आयात खर्च. भारतातील मर्सिडीज कारचे अनेक पार्टस आणि तंत्रज्ञान परदेशातून आयात केले जाते. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे या उत्पादनांच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.
मर्सिडीज-बेंझने असेही म्हटले आहे की वाढत्या किमतींचा परिणाम कमी करण्यासाठी, कंपनीचे फायनान्शियल सर्व्हिस युनिट (MBFS) ग्राहकांना अनेक वित्तीय उपाय देत आहे. याद्वारे, ग्राहक सुलभ EMI आणि कस्टमाइज्ड लोन प्लॅन द्वारे वाढलेल्या किमतींचा परिणाम कमी करू शकतात. जर तुम्ही मर्सिडीज कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही सर्वोत्तम वेळ आहे, कारण १ जून २०२५ पासून सर्वच मॉडेल्सच्या किमती वाढणार आहे.