प्रदूषणामुळे काय त्रास वाढला आहे आणि कसा होईल उपाय
हवेच्या खालावलेल्या दर्जाच्या गंभीर समस्येवर मात करण्याची मुंबईची सुरू असलेली धडपड दिल्लीतील वायूप्रदूषणाच्या संकटाची आठवण करून देणारी आहे आणि याचे आर्थिक परिणामही दिवसेंदिवस अधिकच गंभीर बनत चालले आहेत. “अतिकठोर उपाययोजना” केल्याशिवाय या प्रचंड वायूप्रदूषणावर नियंत्रण मिळवता येणार नाही ही बाब मुंबई उच्च न्यायालयाने अधोरेखित केली आहे आणि भविष्यात डिझेलची वाहने टप्प्याटप्प्याने वापरातून दूर करत केवळ इलेक्ट्रिक किंवा सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांनाच परवाने देण्यातील व्यवहार्यतेविषयी वकील व प्राधिकाऱ्यांकडे विचारणा केली आहे.
सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास भारताच्या आर्थिक राजधानीचा आरोग्यसेवाचा खर्च ५,३०० कोटी रुपयांच्या पार जाऊ शकतो. अलीकडच्या एका पाहणीतून हाती आलेल्या निष्कर्षांनुसार या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चाललेल्या समस्येचे समाधान का पायाभूत बदलामध्ये दडलेले आहे: हा बदल आहे इलेक्ट्रिक व्हेईकल्स (EVs)च्या दिशेने वेगाने संक्रमण. यासंदर्भातील आकडेवारी चिंताजनक आहे. मुंबईचे वाहतूक जाळे खासगी वाहनांवर प्रचंड प्रमाणात अवलंबून आहे, जिथे सुमारे १२ लाख गाड्या अनिर्बंध ट्राफिकमध्ये व प्रदूषणामध्ये भर टाकत आहेत. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यापासून मुंबईच्या हवेचा दर्जा एका निश्चित गतीने ढासळत आहे आणि किनारपट्टीमुळे हवा चांगली राहण्यास मदत मिळत असूनही त्याची श्रेणी “वाईट”च राहिलेली आहे (फोटो सौजन्य – iStock)
काय सांगतात तज्ज्ञ
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हानस्ड स्टडीजच्या डॉ. गुफरान बेग यांनी लिहिलेल्या “सोर्सेस ऑफ पार्टिक्युलेट पोल्यूटन्ट एमिशन अँड EV बेनिफिट्स इन मुंबई” या शिर्षकाच्या सखोल विश्लेषणावर आधारित निबंधामध्ये गेल्या तीन दशकांमध्ये मुंबईच्या हवेमध्ये मिसळलेल्या कणीय पदार्थ अर्थात पार्टिक्युलेट मॅटरच्या (PM2.5) प्रमाणात ११५ टक्के इतकी भयावह वाढ झाल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे. अशा वाढीमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यसमस्यांमुळे होणारे अकाली मृत्यू व अपंगत्व यांच्या रूपात झालेली लक्षणीय आर्थिक हानी रु. २,३०० कोटींच्या पार गेली आहे व आरोग्यावर होणारा दरडोई खर्च आता रु. १४२७ च्या पुढे गेला आहे.
उपाययोजना करणे महत्त्वाचे
आपणहून काही उपाययोजना हाती घेतल्या नाहीत तर हे आर्थिक नुकसान आणखी वाढू शकते, मृत्यू व अपंगत्वामुळे होणारी हानी अनुक्रमे रु. ४,०४५.५४ कोटी व रु.१,३०९.१७ कोटींवर पोहोचू शकते, असा अंदाज आहे. याचा थेट अर्थ आरोग्यावर होणारा दरडोई खर्च तब्बल रु. ३१७९ वर पोहोचेल असा होतो. या समस्यांचा प्रभावीपणे सामना करायचा तर वाहतूक क्षेत्रामधून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाच्या मूळ कारणांवरच उपाय शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
वाहतुकीतून होणारे प्रदूषण अधिक
वाहतुकीतून होणारा उत्सर्ग हा सध्या मुंबईतील PM2.5 मध्ये भर टाकणारा सर्वात मोठा घटक आहे, ज्याचे प्रमाण ३१.०७ टक्के आहे, त्याखालोखाल रस्त्यावरची धूळ (१८.६६ टक्के) आणि औद्योगिक उत्सर्गांचे (PM2.5 साठी २२.७७ टक्के) प्रमाण सर्वाधिक आहे. वर्ष २०२४ मध्ये PM2.5 मधील १४.६ Gg पदार्थ केवळ वाहतूकीमुळे तयार झाल्याचे सिस्टीम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिक अँड रिसर्च (SAFAR)च्या उत्सर्गाच्या आकडेवारीमध्येही अधोरेखित करण्यात आले आहे. एकूण वाहनांमध्ये २२.५९ टक्के असलेल्या कार्स उत्सर्गाच्या या प्रमाणबाह्य वाढीला जबाबदार आहेत, ज्यांचे योगदान १५.६३ टक्के इतके आहे.
मूल्यमापन गरजेचे
ही श्वेतपत्रिका मुंबईतील वाहतूकीपासून ते औद्योगिक कामकाजांपर्यंत ते निवासी जागांमधून होणाऱ्या उत्सर्गापासून ते कचरा व्यवस्थापनापर्यंत १७ वेगवेगळ्या स्त्रोतांचे अत्यंत बारकाईने मूल्यमापन करते. यातील उल्लेखनीय बाब म्हणजे वाहतूक क्षेत्राद्वारे होणारा जीवाश्म इंधनाचा उत्सर्ग हे सातत्याने शहराच्या हवेच्या ढासळणाऱ्या दर्जामागचे प्रमुख कारण राहिल्याचे दिसून आले आहे.
अशी परिस्थितीमध्ये EVs कडे होणारे संक्रमण एक आशेचा किरण म्हमून उदयास येत आहे. १५ वर्षांहून जुन्या गाड्यांच्या जागी EVs घेतल्याने PM2.5 च्या पातळीमध्ये ४.२४ टक्के घट होऊ शकते, ज्याच्या परिणामी आरोग्यसेवेवरील खर्चात २.४५ टक्के घट होऊ शकते असा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे. अधिक महत्त्वाकांक्षी विचार करायचा झाल्यास, सर्वच गाड्या वीजेवर चालणाऱ्या बनविल्या गेल्यास PM2.5 मधील संहत प्रमाण ५.१७ टक्के कमी होऊ शकते ज्यामुळे आरोग्यसेवेवरील खर्चात सुमारे ३ टक्क्यांची बचत होऊ शकते.
काय आहे केंद्र सरकारचे Bharat Stage, प्रदूषण थांबवण्यास कसे ठरते उपयुक्त?
मोठ्या वाहनांचे विद्युतीकरण
अधिक मोठ्या वाहनांचे विद्युतीकरण करण्याचे फायदे तर अधिकच सुस्पष्टपणे दिसणारे आहेत. लाइट कमर्शियल व्हेइकल्स (LCVs) आणि बसगाड्यांचे विद्युतीकरण केले गेल्यास PM2.5 मध्ये १३.१६ टक्के घट होऊ शकेल, ज्यामुळे आरोग्यसेवेवरील खर्चात १० टक्के हून अधिक बचत होऊ शकेल. जर सर्वच वाहनांचे विद्युतीकरण झाले तर त्या स्थितीमध्ये PM2.5 उत्सर्ग २९.१३ टक्क्यांनी कमी होऊ शकले, ज्यामुळे आरोग्यसेवेवरील खर्चामध्ये १६.८२ टक्के घट होऊ शकेल व यातून शहराच्या आरोग्यसेवा यंत्रणेवरील आर्थिक भार लक्षणीयरित्या हलका होऊ शकेल.
काय आहेत निष्कर्ष
याचे निष्कर्ष अत्यंत सुस्पष्ट आहेत. मुंबईच्या वाहतूक जाळ्याचे इलेक्ट्रिक व्हेइकल्समध्ये संक्रमण होणे ही केवळ पर्यावरणीय गरज नसून ती एक आर्थिक गरज आहे. व्यापक पातळीवर विद्युतीकरणाचा स्वीकार केल्याने शहरातील हवेच्या दर्जामध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते, आरोग्याशी निगिडित खर्च कमी होऊ शकतात व नागरिकांचे एकूण आरोग्य अधिक चांगले होऊ शकते.
अपंगत्वामुळे आयुष्यातील वर्षे कमी होण्याचे प्रमाण म्हणजे डिसएबिलिटी अॅडजस्टेड लाइफ इअर्स (DALYs) कमी होण्याची, सार्वजनिक आरोग्य सुधारण्याची आणि आरोग्यसेवांवरील दरडोई खर्च कमी होण्याची शक्यता हे संक्रमण तातडीने होण्याची गरज अधोरेखित करते.
मुंबई शहर वायूप्रदूषण आणि आरोग्यसेवेचा वाढता खर्च अशा दुहेरी आव्हानाचा सामना करत असताना, इलेक्ट्रिक व्हेईकल्सच्या दिशेने संक्रमण हे एक महत्त्वपूर्ण उपाययोजना म्हणून लक्ष वेधून घेते. विद्युतीकरणाच्या दिशेने एकत्रितपणे केलेल्या प्रयत्नांच्या माध्यमातूनच ही ‘मॅक्झिमम सिटी’ आपल्या हवेचा चांगला दर्जा पुन्हा प्राप्त करण्याची व आपल्या नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्याची आशा करू शकते.