भारतातील रस्ते अपघातांची आकडेवारी दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या ‘रोड ॲक्सिडेंट्स इन इंडिया २०२४’ च्या अहवालानुसार, देशात एका वर्षात तब्बल ४,८७,७०७ रस्ते अपघात झाले. या भीषण अपघातांमध्ये एका वर्षात १,७७,१७७ लोकांनी आपला जीव गमवावा लागला, तर ४.७१ लाखांपेक्षा जास्त लोक जखमी झाले. म्हणजेच भारतात दररोज सरासरी १,३३६ अपघात आणि ४८५ मृत्यू होतात असे म्हणायला हरकत नाही. धक्कादायक गोष्ट म्हणजे, या अपघातांमध्ये सर्वाधिक प्रमाण म्हणजे जवळपास ७०.३% मृत्यू हे हायस्पीड आणि मानवी चुकांमुळे होते. आणि यातील १९ टक्के हिट & रन मुळे आपला जीव गमावतात. हे मृत्यूचे तांडव रोखण्यासाठी ऑटोमोबाईल क्षेत्रातील ADAS आणि LiDAR ही स्मार्ट तंत्रज्ञाने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ती अशाप्रमाणे,
१. ADAS (Advanced Driver Assistance Systems)
हे तंत्रज्ञान वाहनाभोवती घडणाऱ्या घडामोडींवर सतत लक्ष ठेवून चालकाला सतर्क करते आणि मानवी चुका सुधारते,
ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग (AEB): जर महामार्गावर समोर अचानक एखादे वाहन किंवा पादचारी आला आणि चालकाने वेळेत ब्रेक दाबला नाही, तर ही सिस्टीम स्वतःहून ब्रेक लावून गाडी थांबवते. यामुळे मागून होणाऱ्या धडका आणि पादचाऱ्यांचे अपघात ५० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात.
लेन कीप असिस्ट (Lane Keep Assist): डुलकी लागल्यामुळे किंवा दुर्लक्ष झाल्यामुळे गाडी लेन सोडून बाहेर जाऊ लागल्यास, हे तंत्रज्ञान स्टिअरिंगवर नियंत्रण मिळवून गाडीला सुरक्षित लेनमध्ये परत आणते.
२. LiDAR (Light Detection and Ranging)
हे सेन्सर तंत्रज्ञान रात्रीच्या वेळी किंवा खराब हवामानात होणारे अपघात रोखण्यासाठी एक माईलस्टोन आहे,
३D लेझर व्हिजन: लायडार तंत्रज्ञान लेझर किरणांचा वापर करून वाहनाभोवतीच्या परिसराचा एक अचूक ३D नकाशा तयार करते.
अंधार आणि धुक्यात प्रभावी: पारंपारिक कॅमेरे रात्रीच्या अंधारात किंवा दाट धुक्यात अपयशी ठरतात, पण लायडार अशा परिस्थितीतही समोरील वस्तूचे अचूक अंतर मोजू शकते. यामुळे रात्रीच्या वेळी हायवेवर दिसणारे अडथळे किंवा पादचाऱ्यांना वेळेत ओळखून अपघात टाळता येतात.
MoRTH च्या २०२४ च्या अहवालानुसार अपघातांची तीव्रता ३६.३% वर पोहोचली आहे, म्हणजेच अपघात अधिक जीवघेणे होत आहेत. अशा वेळी भारतात नवीन वाहनांमध्ये ADAS आणि LiDAR सारखी प्रगत सुरक्षा फीचर्स अनिवार्य केल्यास, मानवी चुकांमुळे होणारे अपघात आणि रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी करता येऊ शकते.






