आता 'या' कारच्या बॅटरीचे टेन्शन विसरा ! टाटा मोटर्सकडून मिळतेय लाइफटाइम बॅटरी वॉरंटी
भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा (EV) वापर वाढावा यासाठी नवनवीन उपक्रम राबवणाऱ्या टाटा मोटर्स या देशातील आघाडीच्या आणि अग्रणी SUV उत्पादक कंपनीने आज एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. कंपनीने त्यांच्या Curvv.ev आणि Nexon.ev 45 केडब्ल्यूएच या लोकप्रिय इलेक्ट्रिक एसयूव्ही मॉडेल्ससाठी ‘लाइफटाइम बॅटरी वॉरंटी’ सादर केल्याचे जाहीर केले आहे.
या उपक्रमाचा उद्देश म्हणजे ग्राहकांना दीर्घकालीन विश्वासार्हता, चिंता-मुक्त मालकीचा अनुभव आणि टिकाऊपणाचा अधिक मजबूत पर्याय देणे. टाटाने याआधी त्यांच्या नव्याने लाँच करण्यात आलेल्या हॅरियर.इव्ही मॉडेलसोबतच आजीवन एचव्ही (हाय व्होल्टेज) बॅटरी वॉरंटी देऊ केली होती, ज्याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या यशस्वी उपक्रमानंतर, टाटाने आता ही योजना कर्व्ह.इव्ही आणि नेक्सॉन.इव्ही 45 केडब्ल्यूएच या दोन सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल्सपर्यंत विस्तारित केली आहे.
विद्यार्थी, व्यावसायिक व गिग वर्कर्ससाठी बेस्ट स्कूटर मिळाली ! सुरवातीची किंमत फक्त 54000 रुपये
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे मुख्य व्यापारी अधिकारी विवेक श्रीवत्स म्हणाले, “भारतात प्रीमियम इव्ही तंत्रज्ञान अधिक सर्वसामान्य करण्याचे काम टाटा मोटर्सने यशस्वीरित्या केले आहे. आम्ही ग्राहकांना जेव्हा वाहन विकतो, तेव्हा फक्त गाडीच नव्हे तर विश्वास, दीर्घकालीन सुरक्षा आणि चिंता-मुक्त अनुभव विकतो. लाइफटाइम बॅटरी वॉरंटीच्या माध्यमातून आम्ही हाच विश्वास अधिक दृढ करत आहोत आणि भारतातील इव्ही स्वीकृतीला आणखी गती देत आहोत.”
आज उपलब्ध असलेल्या बहुतेक इलेक्ट्रिक वाहनांमध्ये बॅटरी वॉरंटी 8 वर्षांपर्यंत मर्यादित असते. मात्र टाटा मोटर्सने दिलेली आजीवन वॉरंटी ही बाजारातील एक अद्वितीय आणि ग्राहक-केंद्रित योजना आहे. ही वॉरंटी केवळ नवीन ग्राहकांनाच नव्हे, तर या मॉडेल्सचे सध्याचे मालक देखील याचा लाभ घेऊ शकतात.
Bajaj Pulsar N160 चा नवीन व्हेरिएंट लाँच, यंदा ‘या’ सेफ्टी फिचरकडे विशेष लक्ष
बॅटरीचा दीर्घकालीन आरोग्य व्यवस्थापन, बॅटरी रिप्लेसमेंटचा खर्च (जो ८–९ लाखांपर्यंत होऊ शकतो) आणि इव्हीची पुनर्विक्री किंमत ही अनेक ग्राहकांसाठी चिंता असते. ही आजीवन वॉरंटी त्या सर्व चिंतेवर एक विश्वासार्ह उत्तर ठरते. त्यामुळे, ही योजना इव्ही स्वीकारणाऱ्या ग्राहकांना एक मोठा आर्थिक आणि मानसिक दिलासा देणारी ठरते.
याशिवाय, कर्व्ह.इव्ही किंवा नेक्सॉन.इव्ही 45 केडब्ल्यूएच खरेदी करणाऱ्या विद्यमान टाटा.इव्ही मालकांना कंपनीकडून 50000 पर्यंतचा थेट लाभ देखील दिला जात आहे, जो खास लॉयल्टी प्रोग्रामचा भाग आहे.
ही योजना केवळ ग्राहकांच्या हितासाठीच नाही, तर भारतात हरित वाहतूक स्वीकारण्याच्या दिशेने टाटाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. टाटा मोटर्सचा हा निर्णय इव्ही ग्राहकांच्या मनात दीर्घकालीन विश्वास निर्माण करणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.