Hair Care Tips: १० रुपयांमध्ये केस होतील चमकदार आणि काळेभोर! घरीच सोप्या पद्धतीमध्ये तयार करा नॅचरल रिठा शाम्पू
त्वचेप्रमाणे केसांचे सौंदर्य जपण्यासाठी महिलांसह पुरुषसुद्धा सतत काहींना काही करत असतात. कधी बाजारात उपलब्ध असलेल्या हेअर केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो तर कधी केस चमकदार आणि सुंदर दिसावे म्हणून वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट करून घेतल्या जातात. हेअर ट्रीटमेंट केल्यानंतर काहीकाळ केस अतिशय सुंदर दिसतात. पण कालांतराने केसांच्या समस्या वाढून केसांमध्ये कोंडा, केस गळणे, तुटणे इत्यादी समस्या उद्भवतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सतत येणाऱ्या घामामुळे केस पूर्णपणे ओले होऊन जातात. ज्यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याची जास्त शक्यता असते. केस ओले झाल्यानंतर ते व्यवस्थित न सुकवल्यास टाळूवर कोंडा वाढून केस पूर्णपणे खराब दिसू लागतात. त्यामुळे केसांची काळजी घेणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – istock)
बऱ्याचदा केस गळण्यास सुरुवात झाल्यानंतर बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या शाम्पू आणि कंडिशनरचा वापर केला जातो. पण चुकीचे प्रॉडक्ट लावल्यामुळे केस आणखीनच कोरडे आणि निस्तेज होऊन जातात. त्यामुळे केसांच्या समस्या कमी करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या शाम्पूचा वापर करण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. आज आम्ही तुम्हाला रिठा वापरून नॅचरल शाम्पू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. रिठा केसांच्या वाढीवर आणि गुणवत्तेवर सकारात्मक परिणाम करतात. पूर्वीच्या काळी महिला केस स्वच्छ करण्यासाठी रिठा, शिकेकाई आणि आवळा इत्यादी पदार्थांचा वापर करायच्या.
आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या रिठा बाजारात सहज उपलब्ध होतात. शाम्पू बनवण्यासाठी सर्वप्रथम, रीठामधील बिया बाजूला काढून हाताने कुसकरून घ्या. त्यानंतर भांड्यात पाणी घेऊन रिठा त्यात टाकून भिजत ठेवा. रात्रभर पाणी तसेच ठेवल्यानंतर सकाळी उठल्यानंतर पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी उकळी आल्यानंतर वरती फेस येईल. सर्व मिश्रण व्यवस्थित घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करून थंड करण्यासाठी ठेवा. थंड झालेले मिश्रण हातांच्या मदतीने मिक्स करा. त्यानंतर गाळणीच्या सहाय्याने गाळून तयार केलेला शाम्पू बाटलीमध्ये भरून ठेवा. यामुळे नॅचरल शाम्पू लवकर खराब होणार नाही.
केस धुवण्याआधी केस पूर्णपणे ओले करून घ्या. त्यानंतर तयार केलेला शाम्पू केसांवर लावून ५ मिनिटं हलक्या हाताने मसाज करा. या शाम्पूला जास्त फेस येणार नाही. याशिवाय केसांची स्वच्छता कायमच राहील. त्यानंतर साध्या पाण्याचा वापर करून केस स्वच्छ धुवून घ्या. आठवड्यातून दोनदा रिठाचा शाम्पू केसांवर लावल्यास केस स्वच्छ होण्यास मदत होईल आणि केसांमध्ये वाढलेला कोंडा गायब होऊन केस चमकदार दिसतील. स्काल्पवरील घाण, तेल आणि धूळ साफ करण्यासाठी रिठा शाम्पूचा वापर करावा.






