सध्या भारतात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा प्रयोग मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला आहे. यामुळे कच्च्या तेलाची आयात कमी होण्यास मदत होत आहे. पेट्रोलमध्ये २० टक्क्यांपर्यंत इथेनॉल यशस्वीरीत्या मिसळले जात असताना, अनेकांच्या मनात हा प्रश्न येतो की, “हेच इथेनॉल आपण डिझेलमध्ये का मिसळू शकत नाही?” कारण भारतातील मालवाहतूक आणि सार्वजनिक वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर डिझेलवर चालते. तांत्रिक आणि रासायनिक कारणांमुळे डिझेलमध्ये इथेनॉल थेट मिसळणे अशक्य आहे. त्यामागची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत,
१.रासायनिक भिन्नता
इथेनॉल हे निसर्गाने ‘हायड्रोफिलिक’ आहे, म्हणजेच ते पाण्याला स्वतःकडे आकर्षित करते. डिझेल हे हायड्रोकार्बन आहे, जे पाण्याच्या संपर्कात येत नाही. जेव्हा डिझेलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा ते योग्य प्रकारे एकजीव होत नाही. काही वेळातच इथेनॉल आणि डिझेलचे थर वेगळे होतात, ज्यामुळे इंजिनमध्ये फक्त डिझेल जाण्याऐवजी पाणीयुक्त इथेनॉल जाते आणि इंजिन निकामी होऊ शकते.
२. सिटेन नंबर आणि इग्निशनची समस्या
डिझेल इंजिन हे ‘कॉम्प्रेशन इग्निशन’ तत्त्वावर चालते. म्हणजेच, यात स्पार्क प्लग नसतो, तर हवा दाबून निर्माण झालेल्या उष्णतेने डिझेल पेटवले जाते. डिझेलचा ‘सिटेन नंबर’ (पेट घेण्याची क्षमता) जास्त असणे गरजेचे असते. परंतु, इथेनॉलचा सिटेन नंबर अत्यंत कमी असतो. डिझेलमध्ये इथेनॉल मिसळल्यास इंजिन वेळेवर पेट घेत नाही, ज्यामुळे इंजिनमधून मोठा आवाज येणे आणि इंजिन सुरू न होणे अशा समस्या उद्भवतात.
पेट्रोलच्या वाढत्या दरांना पर्याय काय? CNG की हायब्रीड; तुमच्या खिशासाठी कोणती कार ठरेल ‘पैसा वसूल’?
३. वंगण गुणधर्माचा अभाव
डिझेल हे निसर्गाने थोडे तेलकट असते. ते इंजिनमधील फ्युएल पंप आणि इन्जेक्टर्ससाठी स्वतःच वंगण म्हणून काम करते. याउलट, इथेनॉल हे कोरडे असते. डिझेलमध्ये ते मिसळल्यास इंजिनच्या भागांमधील घर्षण वाढते आणि फ्युएल इन्जेक्शन सिस्टीम लवकर खराब होते.
४. गंज लागणे आणि नुकसान
इथेनॉलमुळे कारमधील रबर, प्लास्टिकचे पाईप्स आणि ॲल्युमिनियमच्या भागांना गंज चढतो. डिझेल गाड्यांची इंधन यंत्रणा यासाठी तयार केलेली नसते.
पर्याय काय आहे?
डिझेलमध्ये इथेनॉल ऐवजी ‘बायोडिझेल’ मिसळले जाते, जे जट्रोफा, पाम तेल किंवा जुन्या स्वयंपाकाच्या तेलापासून बनवले जाते. बायोडिझेलचे गुणधर्म डिझेलसारखेच असल्याने ते इंजिनला इजा न पोहोचवता सहज मिसळता येते.






