कथा या साहित्य प्रकारात कसदार लेखन करणारे अनेक लेखक आहेत तसेच कथाकारांचा प्रभाव असणारे, त्यांचे अनुकरण करणारे व आपल्या भावना व्यक्त करणारे अनेक नवीन लेखक आणि लेखिका उदयाला येत आहेत. या नवकथाकारांच्या कथा, कविता यांची तुलना प्रस्थापित कथाकारांशी होऊच शकत नाही. कोणत्याही अर्थाने प्रस्थापित कथाकारांच्या तुलनेत त्यांचे लेखन, आशय, अभिव्यक्ती अत्यंत सामान्य असली तरी ज्या उर्मीने ते व्यक्त होतात, पदरमोड करून आपले साहित्य लोकांपुढे ठेवतात त्यांच्या या आत्मविश्वासाचे कौतुक करायलाच हवे, त्याला दाद द्यायलाच हवी.
मॅटिल्डा अँथनी डिसिल्वा हे असेच एक नवीन नाव. एकिकडे प्रपंचाचं रहाटगाडगं सावरत, बँकेतील नोकरी सांभाळत स्वत:च्या सर्जनशीलतेला जोपासण्याचं त्यांचं सातत्य कौतुकास्पद आहे. सभोवतालच्या बदललेल्या जीवनाचे, माणसांच्या मानसिकतेचे, कुटुंब व्यवस्थेचे अनेक पैलू त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘निवांत’ या कथासंग्रहात पाहायला मिळतात.
मॅटिल्डा डिसिल्वायांचा ‘निवांत’ हा पहिलाच कथासंग्रह. या कथासंग्रहात अठरा कथा आहेत. त्यांपैकी काही १९८२ ते २०२१ या काळात विविध नियतकालिके, दिवाळी अंक यातून प्रकाशित झाल्या आहेत. मानवी जीवनात आणि मानवी जगण्यात अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांना माणसांना सामोरे जावे लागते. सगळ्याच प्रसंगांचा शेवट गोड होतो असे नाही व त्याची उकल करण्यात मनुष्य यशस्वी होतो असेही नाही. पण संवेदनशील मनाची माणसे या सर्व घडामोडींचे अवलोकन करतात. त्यातील अधिक-उणे तपासतात. मनुष्य व त्याचे कर्म, त्याची जीवनजगण्याची पद्धती याचा त्यांच्या पद्धतीने खोलवर जाऊन शोध घेत तो अनुभव शब्दबद्ध करतात.मॅटिल्डा डिसिल्वा यांनी ‘निवांत’ या कथासंग्रहात लिहिलेल्या कथा हे केवळ त्यांचे कल्पनारंजन नसून समाजव्यवस्थेतील त्यांच्या मनाने टिपलेले कडू-गोड वास्तव आहे.
प्रस्तुत कथासंग्रहातील सर्वच कथा वाचनीय आहेत. लेखिकेची साधी-सरळ शैली यात आहे. त्यामुळे कथा संवादी वाटतात. कुठेही अतिरिक्त भाष्य नाही की पाल्हाळ नाही. एखादी घटना, प्रसंग, व्यक्ती घेऊन त्यांच्या जीवनातील प्रसंग, नाट्य मांडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे सर्व कथा आटोपशीर आहेत. प्रत्येक कथेच्या प्रारंभी चित्रकार पॉल डिमेलो यांनी काढलेली रेखाचित्रेही अर्थपूर्ण वाटतात.
‘निवांत’मधील बहुतांशी कथा कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्थेशी निगडित आहेत. कुटुंबातील माणसे, त्यांचे स्वभाव, अहंकार, आपापसातील नातेसंबंध, त्यात उठलेले वादळ, आलेली संकटे, त्याच्याशी मुकाबला करत असताना येणारे नैराश्य हे सांगणाऱ्या या कथा आहेत. कथांमधील पात्रांच्या नावावरून व कथेत येणाऱ्या वर्णनावरून वसई व आसपासच्या परिसरातील लेखिकेचा अनुभव वाचताना जाणवतो. गेल्या काही वर्षात कुटुंब व्यवस्था ढवळून निघाली आहे. त्याचे प्रतिबिंब घर, टि.व्ही.वरील मालिका, वर्तमानपत्रातील बातम्या यांवरून आपल्याला नेमाने दिसत आहे.
कामांध व वासनासक्त झालेला पुरुष पोटच्या मुलीवरही हात टाकण्यास मागेपुढे पाहत नाही. हे क्रौर्य ‘चावरं कुंपण’ या कथेत आहे. मुलीशीच केलेल्या वर्तनामुळे पूजाचा (मुलगी) सर्व पुरुष जातीवरचा विश्वास उडतो व ती उद्ध्वस्त होते. मुलीचे आयुष्य फुकट जावू नये म्हणून आई तिला शिमल्याला पाठवते. तेथे ती रमते व शिक्षिकेचा पेशा स्वीकारते. वासनांध नवऱ्याच्या बीभत्स वर्तनापायी संतापलेली त्याची पत्नी त्याला झाडूने मारून घरातून हाकलून देते. मात्र आपल्या वाईट वर्तनाबद्दल एका पित्याला झालेल्या यातना, पश्चाताप या संदर्भातील कथन या कथेत येत नाही. त्यामुळे वाचताना काही अंशी ही कथा वाचताना खटकते.
‘मनोमिलन’ या कथेत लग्न ठरलेल्या जोएलची पत्नी प्रीती आजारी पडते, तिच्या आजाराचे निदान केले असता डॉक्टर तिला भविष्यात अपत्य होणार नाही असे सांगतात. ही बातमी जोएल त्याच्या घरच्यांना सांगतो. लग्न मोडणे या पर्यायापर्यंत मुलाच्या घरच्यांचा निर्णय होतो. मानसिक समाधानासाठी जोएल चर्चमध्ये मेस्सीला जातो आणि फादरना भेटतो. वस्तुस्थिती सांगतो. फादर जोएलला लग्न मोडण्यापेक्षा एखादं मुल दत्तक घे. अशी केलेली गोष्ट देवाला आवडते असा सल्ला देतात. जोएलच्या घरचे हा सल्ला ऐकून आनंदित होतात व प्रीतीला स्वीकारतात.
घाईगर्दीच्या बदलत्या जीवतात, समाजव्यवस्थेत जगत असताना ‘मनोमिलन’ या कथेचा शेवट सुखद व स्वागतार्ह आहे. खऱ्याप्रेमाच्या शाश्वततेचा प्रत्यय व फादरांनी सांगितलेले नियतीतत्त्व यातून दिसते.
‘टेकऑफ’ तसेच ‘निवांत’ याकथांमध्ये आधुनिकीकरणामुळे आलेली समृद्धी पण त्याचबरोबर अधिक विसंवादी व नात्यातील तुटणारा दुवा, नैतिकतेचे अध:पतन यावर बोट ठेवले आहे. प्रचंड लाडाकोडात वाढलेला सूरज एकुलता एक मुलगा. तो पुढील शिक्षणासाठी परदेशात जातो. त्याच्या शिक्षणासाठी वडील स्वत:चा प्रोविडेंटफंड वापरतात आणि बँकेचे कर्जही घेतात. नोकरी, पैसा, चेन यात रमलेला सूरज वडिलांच्या मृत्युपश्चात घरी येतो. आई-वडिलांचे बँकेतील खाते बंद करून सगळे पैसे स्वत:च्या खात्यात जमा करतो. बंगला विकतो. आईला आपल्याबरोबर परदेशात चल असे सांगतो. तिचे विमानाचे तिकिट काढतो. विमानतळावर आईला झोप लागली आहे असे दिसताच तिला तसेच सोडून स्वतः निघून जातो. आत्यंतिक हव्यासापायी मातेलाही लिलया फसवणारा तिचा उच्चशिक्षित मुलगा सूरज म्हणजे स्वार्थाचे भांडार आहे. ‘टेकऑफ’ कथेतील प्रारंभी येणारे सुजाता वहिनीच्या बंगल्याचे वर्णन व कथेतील सूरजने त्यांना दाखवलेलं विमान ‘आपले पंख पसरून – आकाशात झेपावत होते!!’ हे शेवटचे वाक्य आईच्या मनाची घालमेल दाखविणारी आहे.
‘धर्ममाणुसकीचा’ या कथेत गरीब घरातील शिरीन या सूनेचा सॅमच्या घरात जाच होतो. शिरीन व सॅम यांचा प्रेमविवाह असतो. त्यांचे प्रेम त्यांच्या कुटुंबाला मान्य नसल्यामुळे ते एकमेकांच्या कुटुंबावर चिखलफेक करतात. त्यांच्या लग्नाला विरोध होतो. त्याचे पर्यवसान शिरीन व सॅम पळून जाऊन लग्न करतात. लॉकडाऊन लागतं. तशात शिरीनला दिवस जातात. ती प्रसुत होते पण बाळमृत्यू पावते. लॉकडाऊनमुळे दफनासाठी खड्डा खणायला फादर पुढे सरसावतात. कोरोनाच्या काळात मजूर मिळत नव्हते म्हणून मृत बाळासाठी स्वतःच कबर खोदून धर्मगुरूंनी दाखवलेलं माणुसकीचं दर्शन अंतर्मुख करणारे आहे.‘निखारा’ कथेत मदत करणाऱ्या कविताला श्वेतानं मदतीचा हात दिल्यावरती सागरला आपल्या प्रेमपाशात ओढून हात दाखवते.
लेखिकेच्या विज्ञानकथेचा ‘रोबोट’ प्रयत्नहीचांगला आहे. १४ जानेवारी ३०१७ सालात एका कल्पनारम्य जगात लेखिका घेऊन जाते. पदोपदी अपमान सहन करूनही हुशार, गरीब शुभा श्रीमंत प्रीतीला एका प्रसंगातून वाचवते. शिक्षणाच्या संस्काराचे दर्शन या कथेतून घडते.
खाष्ट सासू म्हणून लौकिक असणाऱ्या अनुबाई आणि सून रोशन यांच्या अनोख्या नात्याचं दर्शन ‘श्रद्धांजली’ या कथेत आले आहे. आपल्या मुलाचे लग्न होईल आणि आपण जेव्हा सासू होऊ तेव्हा आपणही आपल्या सुनेबरोबर तसेच वागू. हीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल अशी शपथ घेते.
मतिमंद मुलांच्या अनुभवावर आधारित ‘मोकळा’ ही कथा वाचताना आपण सुन्न होऊन जातो.
मॅटिल्डा अँथनी डिसिल्वा यांच्याकथांमधील जग हे वास्तव आहे. बँकिग क्षेत्रात काम करताना आपुलकीच्या नात्याने ग्राहकांशी झालेला संवाद, आलेला अनुभव, जाणवलेलं वेगळेपण या कथांना स्पर्शून गेले आहे. मॅटिल्डा या सिद्धहस्त लेखिका नाहीत. त्यांच्या कथांमधील आशय, अभिव्यक्ती दर्जेदार नसेलही. भाषेचे भांडार कमी असल्याची ग्वाही त्यांनी मनोगतात व्यक्त केलेली आहेच, तरीही या कथासंग्रहातील अनुभव सच्चे आहेत. वसई, सोपारा परिसर, तेथील कुटुंब, बरी-वाईट माणसे या सगळ्यांचा आलेख या कथांमधून रेखाटला आहे. संग्रहाच्या मुखपृष्ठावरील शांत, संयत असं आजीचं झोपाळ्यावर निवांत बसलेलं चित्र. आजीचा पेहराव कथासंग्रहातील कथांना वसईच्या खाऱ्या वाऱ्याचा स्पर्श आणि फुलांचा गंध सांगून जातो. म्हणूनच साध्या-सोप्या भाषेतील कथा वाचताना अंतर्मुख व्हायला होते हेच मॅटिल्डा यांच्या कथेचे यश आहे.
प्रा. रघुनाथ राजाराम शेटकर
(raghunathshetkar0@gmail.com )
निवांत (कथासंग्रह)
लेखिका : मॅटिल्डा अँथनी डिसिल्वा
प्रस्तावना : फादर फ्रान्सिस दिब्रिटो
प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन
मुखपृष्ठ : पॉल डिमेलो
पृष्ठे :११३, मूल्य : रु. २००/-