भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींंमध्ये रिलायन्स समुहाचे मुकेश अंबानी आणि अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे नाव नेहमीच पुढे असते. भारतातीलच नव्हे तर आशियातील आणि जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही या दोन्ही उद्योजकांचा अग्रक्रम असतो. मात्र ब्लुमबर्गने जाहीर केलेल्या 100 अब्ज डॉलर्सच्या क्लबमध्ये दोघांनाही स्थान मिळाले नाही आहे. त्यामुळे हा एक मोठा धक्का आहे. ब्लूमबर्गने अहवाल दिला आहे की अदानी आणि अंबानी दोघेही त्यांच्या “एलिट सेंटीबिलियर्स क्लब”मधून बाहेर पडले आहेत, ज्यामध्ये १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त संपत्ती असलेल्यांचा समावेश आहे.
अंबानींच्या संपत्तीत घट होण्याचे कारण
ब्लुमबर्गच्या अहवालानुसार, अंबानींच्या संपत्तीला फटका बसल्याचे कारण हे त्यांच्या समूहाच्या ऊर्जा आणि किरकोळ व्यवसायांची कामगिरी खराब झाली. वाढत्या कर्जाबद्दल गुंतवणूकदार चिंतेत आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार यावर्षी जुलैमध्ये मुलगा अनंतचे लग्न झाले तेव्हा त्यांची संपत्ती 120.8 अब्ज डॉलर्स होती, ती आता 13 डिसेंबरपर्यंत कमी होऊन 96.7 अब्ज डॉलर्स झाली आहे. त्यामुळे तब्बल 24 अब्ज डॉलर्सची घट संपत्तीमध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे.
अदांनीची संपत्ती 40 अब्ज डॉलर्सने घसरली
अदांनींची संपत्तीमध्ये मागील 6 महिन्यात तब्बल 40 अब्ज डॉलर्सने घसरली आहे. जूनमध्ये अदानींची संपत्ती ही 122.3 अब्ज डॉलर्स होती ती 82.1 अब्ज डॉलर्स झाली आहे. अदानींना हिंडेनबर्ग रिसर्च रिपोर्टचा फटका बसला आहे तर फसवणूकींच्या आरोपाचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.
भारतातील आताच्या टेलिकॉम कंपन्यांना धोका
या अहवालात असेही नमूद केले आहे की अमेरिकेचे निवडून आलेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगामी प्रशासनामुळे अनिश्चितता आहे.जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीच्या भारतामधील सॅटेलाइट ब्रॉडबँड बाजारपेठेत होत असलेल्या संभाव्य प्रवेशामुळे भारतातील आताच्या टेलिकॉम कंपन्यांना धोका निर्माण होऊ शकतो.
ब्लूमबर्गनुसार सर्वात श्रीमंत कुटुंब
ब्लूमबर्गनुसार जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांच्या २०२४ च्या यादीत वॉलमार्ट वॉल्टनने पहिले स्थान पटकावले आहे ज्यांची संपत्ती 432.4 अब्ज डॉलर्स आहे. ही संपत्ती अरब प्रातांतील राजघराण्यांपेक्षा आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलोन मस्कच्या वैयक्तिक संपत्तीपेक्षा जास्त आहे.भारतातून, अंबानी आणि शापूरजी पालनजी यांचे मिस्त्री अनुक्रमे 8 व्या आणि 23 व्या स्थानावर आहेत.
भारतातील सर्वात श्रीमंत असलेल्या काही व्यक्तींच्या संपत्तीत चांगलीच वाढ
मात्र भारतातील सर्वात श्रीमंत असलेल्या काही व्यक्तींच्या संपत्तीत चांगलीच वाढ झाली आहे. जानेवारी 2024 पासून टॉप 20 श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये 67.3 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. एचसीएलचे शिव नाडर यांच्या संपत्तीमध्ये सर्वात जास्त 10.8 अब्ज डॉलर्स आणि सावित्री जिंदाल यांच्या संपत्तीत 10.1 अब्ज डॉलर्सची भर पडली आहे.