भारतातील शेअर बाजारामध्ये होत असलेल्या जबरदस्त भांडवल वाढीमुळे सर्वच देश आवाक झाले आहेत. डिसेंबरमध्ये जगातील टॉप 10 देशांच्या शेअर बाजारापेक्षा भारतीय शेअर बाजारात झालेली भांडवल वाढ ही सर्वात जास्त होती. या महिन्यात भारतीय शेअर बाजारातील भांडवलात तब्बल 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील 3 वर्षातील ही सर्वात जास्त वाढ आहे. सलग 4 महिने शेअर बाजारातील भांडवलामध्ये घट झाल्यानंतर ही वाढ दिसून येत आहे. ब्लूमबर्गने त्यांच्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, भारतीय शेअर बाजाराचे एकूण भांडवल सुमारे 4.93 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे. यामध्ये डिसेंबरमध्ये 9.4 टक्के वाढ झाली, ही वाढ मे 2021 नंतरची सर्वात जास्त वाढ आहे. यापूर्वी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्यास प्राधान्य दिल्याे बाजारातील भांडवलात सातत्याने घट होत होती.
अमेरिका, चीन आणि जपानमधील शेअर बाजाराची स्थिती
भारतीय बाजाराच्या तुलनेमध्ये अमेरिका, चीन आणि जपान या जगातील मोठ्या बाजारपेठांची स्थिती पाहिली, तर डिसेंबरमध्ये त्यांची स्थिती ही फारच वाईट असल्याचे दिसून येते आहे. 63.37 ट्रिलियन डॉलर्सच्या मार्केट कॅपसह जगातील सर्वात मोठा शेअर बाजार असणाऱ्या अमेरिकन शेअर बाजारात 0.42 टक्क्यांची घसरण झाली आहे.दुसऱ्या क्रमांकावर असलेला चीनच्या शेअर बाजारातील भांडवल हे 10.17 ट्रिलियन डॉलर्स आहे, त्या बाजारातही 0.55 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर जगातील तिसऱ्या क्रमांकाचा शेअर बाजार असणाऱ्या जपानमधील शेअर बाजाराचे भांडवल 6.28 ट्रिलियन डॉलर्स आहे. जपानमध्येही या कालावधीत 2.89 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे या तीनही मोठ्या शेअर बाजारात घसरण होत असताना भारतीय शेअर बाजार मात्र वधारला आहे ही लक्षणीय बाब आहे.
परदेशी गुतंवणूकदार भारताकडे परतला
भारतीय बाजारामधील वाढ आणि त्याचे भांडवलीकरण डिसेंबरध्ये मजबूत झाले याचे प्रमुख कारण हे परदेशी गुंतवणूकदाराचे पुनरागमन आहे. या महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी तब्बल 2.37 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. तर मागील दोन महिन्यात परदेशी गुंतवणूकदाराने आपली गुंतवणूक काढली होती. ऑक्टोबरमध्ये 11.2 अब्ज डॉलर आणि नोव्हेंबरमध्ये 2.57 अब्ज डॉलरची गुंतवणूक परदेशी गुंतवणूकदारांनी काढले होते.
जगातील इतर शेअर बाजारातील गुंतवणूक
जगातील इतर शेअर बाजारातील गुंतवणूकीबद्दल विचार केल्यास, जगातील चौथ्या क्रमांकाची बाजारपेठ असलेल्या हाँगकाँगच्या शेअर बाजारामध्ये वाढ झाली आहे. 5.57 ट्रिलियन डॉलर्सच्या या बाजारपेठेत 4.13 टक्के वाढ झाली आहे. याशिवाय कॅनडाच्या शेअर बाजाराच्या भांडवलात 5.56 टक्क्यांची घसरण झाली, तर ब्रिटनच्या बाजारात 2.84 टक्क्यांची घसरण झाली. स्वित्झर्लंडचे बाजार भांडवल 4.02 टक्क्यांनी घसरले. जर्मनीच्या शेअर बाजाराचे मार्केट कॅप 1.22 टक्क्यांनी घसरले आहे. अनेक शेअर बाजारात घसरण झाल्याचेच दिसत आहे.
सोन्याप्रमाणेच आता चांदीवरही हॉलमार्किंगची तयारी ; फक्त ‘या’ कारणामुळे होतेय अडचण