कॅन्सरवरील उपचाराबाबत अर्थसंकल्पात महत्वाची घोषणा; सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात उपचार!
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ च्या संपूर्ण अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. प्रामुख्याने कर्करोगाच्या (कॅन्सर) उपचारात वापरल्या जाणाऱ्या 3 औषधांची कस्टम ड्युटी अर्थात सीमा-शुल्क कमी होणार आहे. ज्यामुळे ही औषधे स्वस्तात मिळण्यास मदत होणार आहे.
3 औषधांची कस्टम ड्युटी कमी होणार
मागील अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी लसीकरण मोहिमेची घोषणा केली होती. अशातच आता कर्करोगाच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या 3 औषधांची कस्टम ड्युटी कमी झाल्याने, कर्करोगावर उपचार घेण्यासाठी सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे आता अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात आरोग्यासाठी केलेली ही घोषणा महत्वाची मानली जात आहे.
अर्थमंत्र्यांचे भाषण सुरु होताच शेअर बाजारात उसळी; घसरणीनंतर पुन्हा सावरले शेअर मार्केट!
लाखो रुग्णांना फायदा होणार
यावेळीच्या संपूर्ण अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅन्सरवर स्वस्तात उपचार मिळण्यासाठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आता कॅन्सरच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या तीन औषधांची कस्टम ड्युटी कमी केली होणार आहे. त्यामुळे या औषधांच्या किमती कमी होतील, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. याचा थेट फायदा लाखो रुग्णांना होणार आहे. याशिवाय एक्स-रे मशीनसह अनेक वैद्यकीय उपकरणांवरही सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गेल्या अर्थसंकल्पात गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाबाबत घोषणा
अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांचा हा सलग सातवा अर्थसंकल्प आहे. लोकसभा निवडणुकीमुळे अंतरिम अर्थसंकल्प फेब्रुवारीमध्ये सादर करण्यात आला होता. अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस देण्याची घोषणा केली होती. याशिवाय अंतरिम अर्थसंकल्पात देशात गर्भाशयाच्या मुखावरील लसीवरील संशोधनाला चालना देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा करण्यात आली होती. अशातच आता कर्करोगावरील (कॅन्सर) 3 औषधांची कस्टम ड्युटी कमी होणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.