अर्थसंकल्पात प्रत्येक राज्याचे नाव घेऊ शकत नाही; अर्थमंत्री सीतारामन विरोधकांवर भडकल्या!
अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्पाविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर विरोधकांनी काही राज्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. तर सीतारामन यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आणि कोणत्याही राज्याकडे दुर्लक्ष केले नसल्याचे सांगितले आहे.
दीर्घकाळ सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने समजून घ्यावे
विरोधकांच्या आरोपांवर टीका करताना निर्मला सीतारामन म्हणाल्या, “काँग्रेस दीर्घकाळ सत्तेत राहिली आणि या काळात त्यांनी अनेक अर्थसंकल्प सादर केले. त्यांना माहीत आहे की, अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान प्रत्येक राज्याचे नाव घेणे शक्य नाही. अर्थसंकल्प मी महाराष्ट्राचे नाव घेतले नाही, केवळ उदाहरण म्हणून सांगितले गेले. पण तेथील एका प्रोजेक्टसाठी 76 हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे, तर या राज्याकडे दुर्लक्ष झाले आहे, असे मानले जाईल का? असा सवालही सीतारामन यांनी केला आहे.
बजेट सादर झाले! अन् मुकेश अंबानींना बसला 9,206 कोटींचा फटका! वाचा नेमके कारण…
सीतारामन यांनी विरोधकांना सुनावले
अर्थसंकल्पीय भाषणात कोणत्याही राज्याचे नाव घेतले नसेल तर याचा अर्थ या राज्यांना काहीही मिळाले नाही असे होत नाही. अशा शब्दांमध्ये सीतारामन यांनी विरोधकांना सुनावले. यानंतरही सरकारने सादर केलेल्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारने अनेक राज्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी राज्यसभेतून सभात्याग केला.
काय म्हटलंय सीतारामन यांनी?
विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर राज्यसभेत संबोधित करताना निर्मला सीतारमण म्हणाल्या की, “विरोधी पक्षनेते मल्लिकार्जून खर्गे त्यांचे मत मांडण्यासाठी उभे राहिले. परंतु, माझे मत ऐकण्यासाठी ते थांबले नाहीत. लोकशाहीच्या सन्मानार्थ तरी त्यांनी इथे थांबायला हवे होते. या देशात काँग्रेस पक्ष बराच काळ सत्तेत आहे. त्यांनी खूप वेगवेगळे अर्थसंकल्प सादर केले आहेत. त्यामुळे त्यांनाही कळले पाहिजे की प्रत्येक अर्थसंकल्पात प्रत्येक राज्याचे नाव घेता येणे शक्य नाही,” असे स्पष्टीकरण देत निर्मला सीतारमण यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.