नवी दिल्ली : देशाच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील (आयटी) आघाडीच्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे बोनस घटवले आहेत किंवा काही काळासाठी बोनस देणे लांबणीवर टाकले आहे. या कंपन्यांच्या अमेरिका आणि युरोपातील ग्राहक कंपन्यांनी आपले व्यवसायविषयक अंदाजपत्रकाला कात्री लावली आहे. या दोन्ही प्रदेशांमध्ये मंदीचे सावट असल्यामुळे तेथील अनेक कंपन्यांनी तंत्रज्ञानाधिष्ठित व्यवसायविस्तार लांबणीवर टाकला आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतातील आयटी कंपन्यांच्या उत्पन्नावर ताण येत आहे.
अमेरिका आणि युरोप येथील कंपन्यांना कोरोना काळात मोठा फटका बसल्यानंतर आता कुठे या कंपन्या नफा अनुभवत होत्या. मात्र, भूराजकीय अशांतता आणि यामुळे निर्माण होऊ घातलेल्या मंदीमुळे या कंपन्यांच्या नफ्यावर सध्या विपरित परिणाम होत आहे. परिणामी इन्फोसिस आणि विप्रो या आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या ‘व्हेरिएबल पे’मध्ये कपात केली आहे. काही भारतीय कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतन पॅकेजचा भाग म्हणून व्हेरिएबल पे देतात. हा व्हेरिएबल पे संबंधित कर्मचारी आणि संबंधित कंपनीच्या वर्षभरातील कामगिरीवरून ठरवला जातो. असे व्हेरिएबल पे कमी केल्याचे तसे संदेश या कंपन्यांच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे पाठवल्याचे एका वृत्तसंस्थेने नमूद केले आहे.
कंपन्यांकडून खर्च कमी करण्याचा प्रयत्न
आगामी काळात जागतिक मंदी येणार असून त्यासाठी आपण तयारीत रहायला हवे, ही भावना सध्या उद्योगजगतामध्ये वाढत आहे. त्यामुळे कंपन्या सर्वप्रथम आपले खर्च कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे साहजिकच व्यवसायविस्तार लांबणीवर टाकला जाण्याची किंवा त्यासाठी तंत्रज्ञानविषयक खर्चाला कात्री लावली जाण्याची दाट शक्यता आहे. असे प्रकार जगभरातील कंपन्यांकडून सुरू झाले आहेत, असे निरीक्षण एव्हरेस्ट ग्रुप या अमेरिकेतील सल्लागार संस्थेचे मुख्य कार्यकारी यांनी नोंदवले आहे.