केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी; अर्थसंकल्पात वेतन आयोगाबाबत मोठ्या घोषणेची शक्यता!
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. २३ जुलै रोजी केंद्रातील नवीन सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यात देशभरातील 1 कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्राकडून आगामी अर्थसंकल्पात ८ व्या वेतन आयोगासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे नव्याने लागू होणाऱ्या ८ व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी ही आगामी सप्टेंबर २०२४ या महिन्यापासून केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
अर्थसंकल्पात मोठी घोषणा होणार?
सध्याच्या घडीला केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळते. केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनासह अनुषांगिक लाभ, निवृत्तीवेतन आणि इतर सुविधा देखील देते. मात्र, मागील काही दिवसांपासून कर्मचारी संघटना 8 व्या वेतन आयोग लागू करण्याची मागणी करत आहेत. विशेष म्हणजे यासाठी गेल्या काही काळात चर्चेच्या फेऱ्या देखील झाल्या आहेत. मात्र, सरकारने ८ व्या वेतन आयॊगाला यापूर्वी नकारघंटा दाखवली आहे. मात्र, आगामी अर्थसंकल्पात याबाबत मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता
राष्ट्रीय परिषदेच्या सचिवांनी देखील केंद्र सरकारकडून यावर्षी सप्टेंबरपर्यंत 8 वा वेतन आयोग लागू करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. हा आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन, त्यांना मिळणारे अनुषांगिक लाभ आणि भत्ते यामध्ये सुधारणा, दुरुस्ती करण्याची शक्यता आहे. तर निवृत्तीधारकांना पण त्याचा लाभ होईल. यापूर्वी कॅबिनेट सचिवांना मार्गदर्शन करताना काही मंत्र्यांनी देखील 8 वा वेतन आयोग तयार करण्याचे समर्थन केले आहे.
१ कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची प्रतीक्षा
देशात 7 वा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 रोजी लागू करण्यात आला होता. साधारपणे केंद्रीय वेतन आयोगात प्रत्येक 10 वर्षांनी बदल केला जातो. सध्या महागाईने डोके वर काढले आहे. त्यामुळे कर्मचारी संघटना ८ वा वेतन आयोग लागू करण्याची मागणी करत आहेत. मात्र, आता त्याविषयीचे चित्र येत्या 23 जुलै रोजी अर्थसंकल्पात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आता देशभरातील १ कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि वेतनधारकांना ८ व्या वेतन आयोगानुसार, वेतन आणि निवृत्ती वेतनात बदल होण्याची अपेक्षा आहे.