राजकारणी मंगेश म्हसकर बनले शेतकरी, तीन एकरात फुलवली विविध जातीच्या भाजीपाल आणि फळांची बाग
संतोष पेरणे, कर्जत: नेरळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच असलेले मंगेश राजाभाऊ म्हसकर यांनी आपली आवड म्हणून बाग फुलवली आहे.पावसाळ्यात भाताची शेती मध्ये रमणारे मंगेश म्हसकर यांनी आपल्या मालकीच्या जमिनीमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या तसेच वेगवेगळा भाजीपाला आणि विविध फळांची शेती केली आहे.दरम्यान,दररोज सकाळी शेतीसाठी वेळ देणारे म्हसकर यांच्या बागेत पांढऱ्या कांद्याची शेती पासून कोबी,फ्लॉवर आणि शेवग्याचे शेंगा उपलब्ध आहेत. दुसरीकडे ही सर्व शेती सेंद्रिय खते यांचा वापर करून केली जात असल्याने ऑरगॅनिक भाज्या मिळण्याचे हक्काचे ठिकाण म्हणून मंगेश म्हसकर यांची बाग सर्वांना जवळची वाटत आहे.
नेरळ पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या माथेरान डोंगरातून वाहणाऱ्या नाल्याच्या बाजूला मंगेश म्हसकर यांची शेती आहे.त्या बागेमध्ये दहा वर्षापूर्वी ६०० शेवग्याची झाडे लावली होती.आळेफाटा येथून आणलेली रोपे गेली आठ वर्षे शेवग्याच्या शेंगा यांचे पिक म्हसकर यांना देत आहे. प्रामुख्याने हॉटेल मधील सांबार बनविण्यासाठी वापरली जाणारी शेवगा यांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.मात्र त्यानंतर त्या बागेत इलायची केळी (सुकेळी),आंब्याच्या विविध जाती,चिकू,पेरू आणि डहाणूची जांभूळ यांची लागवड केली. कोल्हापूर येथून या सर्व फळांच्या झाडांची रोपे म्हसकर यांनी आणून लावली आहेत.त्यांच्या बागेचे विशेष म्हणजे त्या बागेत संत्रा आणि सफरचंद यांची देखील काही झाडे असून टपोरी बोरी यांच्या आकाराची करवंदे, साखरी बोर आणि फणस अशी वेगवेगळ्या प्रकारची फळ झाडे आहेत.
यावर्षी म्हसकर यांनी आपल्या बागेत मोठ्या प्रमाणावर भाजीपाला शेती तसेच पालेभाज्या यांची शेती केली आहे.त्यात टोमॅटो,वांगे,सिमला मिरची,चिखट मिरची,भेंडी, काकडी,गाजर,फ्लॉवर,कोबी, कारले,दुधी,घोसाळे,कलिंगड, आदी भाज्या आपल्या बागेत फुलविली आहेत.तर पालेभाज्या मध्ये कोथिंबीर,पालक,मुळा,मेथी यांची शेती देखील फुलवली आहे.मात्र त्याहून वेगळा प्रयत्न मंगेश म्हसकर यांनी आपल्या शेतात केला आहे.तब्बल एक एकर जमिनीवर अलिबागचा पांढरा कांदा याची लागवड केली आहे.त्यासाठी अलिबाग येथून रोपे आणली आणि पांढरा कांदा बहरला आहे.त्या शेतीची राखण करणारे एक कुटुंब तेथे तैनात असते.मात्र मंगेश म्हसकर हे दररोज सकाळी दोन अडीच तास आपल्या शेतात प्रसंगी कुदळ घेऊन,फावडा घेऊन शेतीची मशागत करतात.त्यावेळी पाण्याचे नियोजन करण्यासाठी बोअरवेल खोदली असून त्या बोअरवेल मधून सकाळच्या वेळी बागेला पाणी घालण्याचे काम ते न चुकता करीत असतात.
मंगेश म्हसकर यांनी ही शेती आपल्या आईवडिलांनी शेती करायला आवडत होती आणि त्यामुळे सध्या फुलवलेल्या बागेतील सर्व प्रकाराच्या भाज्या,पालेभाज्या या आपल्या मित्र परिवार आणि कुटुंबीय यांच्या सेवेत आहे.त्या बागेतील कोणताही भाजीपाला आणि पालेभाज्या यांची विक्री केली जात नाही.त्याचवेळी पुढील महिन्याने तयार होणारा पांढरा कांदा हा देखील आपल्या मित्र परिवार आणि नातेवाईक यांना देण्यासाठी लागवड केलेला असल्याचे सांगतात.
म्हसकर यांच्या बागेतील सर्व भाज्या आणि पालेभाज्या तसेच फळझाडे यांना केवळ सेंद्रिय खते दिली जातात.त्यात लेंडी खत आणि शेण खत यांचाच वापर केला जात असून त्यांचा फायदा आपल्या शारीरिक वाढीसाठी महत्वाची ठरत असल्याने सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.