फोटो सौजन्य - Social Media
वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी मेडट्रॉनिक आणि आरोग्य तंत्रज्ञानातील अग्रगण्य कंपनी फिलिप्स यांनी कार्डिओलॉजिस्ट आणि रेडिओलॉजिस्ट्ससाठी प्रगत इमेजिंग तंत्रज्ञानावर प्रशिक्षण देण्यासाठी भारतामध्ये सामंजस्य करार (MOU) केला आहे. या भागीदारीअंतर्गत ३०० हून अधिक क्लिनिशियनना स्ट्रक्चरल हृदयविकारांसाठी एकोकार्डिओग्राफी (ECHO) आणि मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग (MRI) यांसारख्या मल्टि-मोडॅलिटी इमेजिंग तंत्रज्ञानावर कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय आणि भारतीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सखोल सत्रे आणि प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. १५ प्रमुख वैद्यकीय संस्थांची निवड करून तेथे ही शैक्षणिक कार्यशाळा राबवली जाणार आहे. यामुळे टीएव्हीआर (Transcatheter Aortic Valve Implantation – TAVI) प्रक्रियेची अचूकता वाढवण्यास मदत होणार आहे.
मेडट्रॉनिक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनदीप सिंग कुमार म्हणाले, “ही भागीदारी रुग्णांना विशेषतः क्रॉनिक किडनी डिजिज (CKD) आणि अंतिम टप्प्यावरील मूत्रपिंडाच्या आजारांवर (ESRD) अधिक प्रभावी उपचार देण्याच्या आमच्या बांधिलकीचा एक भाग आहे. प्रशिक्षित डॉक्टर आणि प्रगत इमेजिंग तंत्रज्ञान यांचा मेळ घालून उपचारांचे निकाल सुधारण्याचे आमचे लक्ष्य आहे.” फिलिप्सचे भारतीय उपखंड प्रमुख भारत शाह यांनी सांगितले, “स्ट्रक्चरल हार्ट इमेजिंगमध्ये शिक्षण आणि नवसंकल्पनांना चालना देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे क्लिनिशियन्सना प्रगत निदानात्मक तंत्रज्ञानाने सक्षम करणे गरजेचे आहे.”
भारतात दरवर्षी सुमारे २.२ लाख नवीन अंतिम टप्प्यावरील मूत्रपिंडाच्या आजाराचे (ESRD) रुग्ण आढळतात, आणि त्यापैकी मोठ्या संख्येतील रुग्णांना आर्टिक स्टेनोसिस होण्याचा धोका असतो. ही स्थिती हृदयाच्या झडपांमध्ये अरुंदपणा निर्माण करते, ज्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा करताना अधिक मेहनत घ्यावी लागते. अशा रुग्णांसाठी Transcatheter Aortic Valve Implantation (TAVI) ही अत्याधुनिक प्रक्रिया अत्यंत फायदेशीर ठरू शकते. तथापि, TAVI प्रक्रियेदरम्यान अचूक निदान व सर्जरीची यशस्वीता वाढवण्यासाठी प्रगत इमेजिंग तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक असते. मेडट्रॉनिकने २००४ मध्ये पहिली TAVI प्रक्रिया केली होती आणि गेल्या दोन दशकांत या तंत्रज्ञानात महत्त्वपूर्ण सुधारणा आणि नवसंकल्पना झाल्या आहेत.
फिलिप्सचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानावर आधारित सॉफ्टवेअर हे 3D ट्रान्सइसोफेगल एकोकार्डिओग्राफी आणि MRI डेटाचा उपयोग करून हृदयाच्या महाधमनीचे अचूक विश्लेषण करण्यास सक्षम आहे. पारंपरिक निदान पद्धतींमध्ये कॉन्ट्रास्ट एजंट्स वापरले जातात, जे मूत्रपिंडांसाठी विषारी (नेफ्रोटॉक्सिक) ठरू शकतात आणि ESRD रुग्णांच्या मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम करू शकतात. मात्र, या नव्या AI-आधारित तंत्रज्ञानामुळे अशा विषारी रंगद्रव्यांचा वापर न करता निदान करता येते, त्यामुळे मूत्रपिंडाच्या आरोग्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम होत नाही. याचा थेट फायदा ESRD रुग्णांच्या आयुष्याचा दर्जा आणि आयुर्मान सुधारण्यात होतो.
ही भागीदारी भारतातील आरोग्यसेवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक नवे युग उघडणार असून, हृदयविकारग्रस्त आणि मूत्रपिंडाच्या आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अत्याधुनिक आणि सुरक्षित उपाययोजना उपलब्ध करून देणार आहे. मल्टि-मोडॅलिटी इमेजिंग तंत्रज्ञान, क्लिनिशियन्ससाठी विशेष प्रशिक्षण, आणि AI-आधारित निदान प्रणाली यांचा मेळ घालून, ही भागीदारी भारतातील रुग्णसेवेत लक्षणीय सुधारणा घडवून आणणार आहे.