अबब! एक किलो आंबा ३ लाख रुपयांना; शेतीमध्ये लावलाय सीसीटीव्ही, 'या' आंब्याची देशभर चर्चा!
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादन घेतले जाते. प्रामुख्याने कोकणचा हापूस आंबा देशभरच नाही तर जगभर आपल्या चवीसाठी विशेष लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना हापूस लागवडीतून मोठ्या प्रमाणात उत्पन्न देखील मिळते. अशातच सध्या एका विशिष्ट प्रजातीच्या आंब्याची मोठी चर्चा रंगली आहे. हा आंबा साधासुधा नसून, त्याला १ किलोसाठी तब्बल ३ ते ३.५० लाख रुपये इतका उच्चांकी दर मिळत आहे. आता तुम्ही विचारात पडला असाल की या आंब्यात विशेष असे काय आहे. तर आम्ही तुम्हाला या विशेष आंब्याची लागवड केलेल्या शेतकऱ्याची यशोगाथा सांगणार आहोत.
‘मियाझाकी’ आंब्याची लागवड
संदीप चौधरी असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते उत्तरप्रदेशातील सहारनपूर येथील रहिवाशी आहेत. संदीप यांनी आपल्या शेतीमध्ये जपानी वाण असलेल्या ‘मियाझाकी’ आंब्याची दोन झाडे लावली आहेत. विशेष म्हणजे या आंब्याची किंमत एक किलोसाठी तब्बल ३ ते ३.५० लाख रुपये इतकी आहे. आंब्याचे हे वाण जपानच्या मियाझाकी विद्यापीठात विकसित करण्यात आले असून, त्याचे जपानी नाव ‘टाइयो नो टमँगो’ असे आहे.
२ झाडांपासून शेतकरी लखपती
शेतकरी संदीप चौधरी सांगतात, मियाझाकी जातीचा हा मूलतः आंबा खायला गोड असतो. या आंब्यांमध्ये अँटीऑक्सिडंट, बीटा-कॅरोटीन आणि फॉलिक अॅसिड असे अनेक महत्वाचे घटक असतात. विशेष म्हणजे हा आंबा कर्करोगाशी सामना करण्यासाठी खूपच उपयुक्त असतो, असा दावा केला जातो. ज्यामुळे या आंब्याला मोठी मागणी असते. आपल्या बागेत सध्या दोन्ही झाडांना पहिल्याच वर्षी एकूण तीन आंबे लागले आहेत. आपण हे तिन्ही आंबे विकल्यास आपल्याला एका झटक्यात लाखांची कमाई होणार असल्याचे ते सांगतात.
खरेदी केले एक आंब्याचे रोप 7500 रुपयांना
शेतकरी संदीप चौधरी सांगतात, आपण गेल्या दोन महिन्यापूर्वी कोलकाता येथून 7500 रुपये प्रति रोप याप्रमाणे मियाझाकी वाणाची २ आंब्याची रोपे खरेदी केली होती. बागेमध्ये आपण ही झाडे जैविक पद्धतीने लावलेली आहेत. सध्याच्या घडीला ही आंबे केवळ तीन फुटाची असून, या दोन्ही झाडांना पहिल्याच वर्षी ३ आंबे आले आहेत.
या वाणाच्या एका आंब्याचे वजन हे 300 ते 350 ग्रॅमपर्यंत असते. अर्थात एका किलोमध्ये जवळपास तीन आंबे बसतात. ज्यामुळे आपल्याला यंदाच्या वर्षी मियाझाकी जातीच्या लागवडीतून पहिल्याच वर्षी ३ लाखांची कमाई होणार आहे. मात्र, पहिल्याच वर्षी लगडलेले हे आंबे आपण देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे हे आंबे महाग असल्याने शेतकरी संदीप चौधरी यांनी आपल्या बागेत ३६० अंशात फिरणारा सीसीटीव्ही लावला आहे. ज्यामुळे या आंब्याची चोरी होण्यापासून बचाव होणार आहे.