ओला ईलेक्ट्रिकमध्ये गुंतवणुकीची सुवर्णसंधी, आयपीओला सेबीकडून मंजूरी!
शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगातील आघाडीची कंपनी ओला इलेक्ट्रिक कंपनीचा आयपीओ बाजारात येण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. सेबीने इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या आयपीओला मान्यता दिली आहे. ज्यामुळे आता कंपनीकडून आयपीओद्वारे 5,500 कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे.
वाहन स्टार्टअपचा पहिलाच आयपीओ
भारतातील इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअपचा हा पहिलाच आयपीओ असणार आहे. तसेच हा नवीन काळातील सर्वात मोठा आयपीओ असेल. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सेबीने २० जून रोजी ओला इलेक्ट्रिक कंपनीला आयपीओसाठी मंजुरी दिली असून, १० जून रोजीच ऑबझर्वेशन पत्र जारी करण्यात आले होते.
किती मोठा असेल आयपीओ?
ओला इलेक्ट्रिकच्या प्रस्तावित आयपीओमध्ये, 5,500 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करणे. तसेच, प्रवर्तक आणि गुंतवणूकदारांकडे असलेले ९.५२ कोटीचे शेअर्स ऑफर फॉर सेल (ओएफएस) द्वारे विक्रीसाठी उपलब्ध असतील. बंगळुरु स्थित ओला इलेक्ट्रिकने ऑगस्ट 2021 मध्ये आपले पहिले ईव्ही दुचाकी मॉडेल लॉन्च केले होते. ही इलेक्ट्रिक टू व्हीलर बनवण्याव्यतिरिक्त ते त्यांच्यासाठी बॅटरी पॅक आणि मोटर्स देखील तयार करते.
मागील वर्षी सेबीकडे केला होता अर्ज
ओला इलेक्ट्रिक कंपनीने 22 डिसेंबर रोजी सेबीकडे आपला मसुदा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला होता. ज्यामध्ये 95.2 दशलक्ष शेअरच्या ऑफर फॉर सेल व्यतिरिक्त नवीन शेअर्सच्या इश्यूद्वारे 5,500 कोटी रुपये उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात होता. अशातच आता कंपनीला आयपीओसाठी सेबीची मंजुरी मिळाल्याने कंपनी आयपीओद्वारे 6 बिलियन डॉलरचे मूल्यांकन करू शकणार आहे.
ओला इलेक्ट्रिक सोबतच सेबीने फार्मास्युटिकल क्षेत्रातील कंपनी एमक्योर फार्मास्युटिकल्सच्या आयपीओला देखील मंजुरी दिली आहे. यामध्ये कंपनी प्रवर्तक आणि गुंतवणूकदारांकडे असलेले 1.36 कोटीचे शेअर्स ऑफर फॉर सेल (ओएफएस) द्वारे विक्रीसाठी उपलब्ध असतील. आणि आयपीओद्वारे एमक्योर फार्मास्युटिकल्स कंपनी 800 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी करणार आहे. आयपीओमधून जमा होणारा निधी कर्जाची परतफेड आणि कंपनीच्या सामान्य कामकाजासाठी वापरला जाणार आहे.
(टीप : वरील सर्व माहिती ही माहितीस्तव देण्यात आली असून, यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आलेला नाही. शेअर बाजारात गुंतवणूक करताना जोखीम असते. गुंतवणूक करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)