'या' पीएसयू शेअरकडून पुन्हा लाभांश घोषित; चालू महिन्याची आहे रेकॉर्ड तारीख, वाचा... सविस्तर!
शेअर मार्केटमधील अनेक शेअर्स गुंतवणूकदारांना अल्पावधीत लाभ मिळवून देत आहे. असाच एक स्टॉक सध्या गुंतवणूकदारांना मालामाल बनवत आहे. अशातच आता या शेअरकडून लाभांश जाहिर करण्यात आला आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने शुक्रवारी (ता.९) तिमाही निकाल जाहीर केले. कंपनी एका शेअरवर 35 टक्के लाभांश देत आहे. त्यासाठीची रेकॉर्ड डेट या महिन्यात निश्चित करण्यात आली आहे. या शेअरची किंमत 2 वर्षांत 300 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.
सरकारी कंपनी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने एका शेअरवर 35 टक्के लाभांश जारी केला असून, या महिन्यातच रेकॉर्ड तारीख निश्चित करण्यात आली आहे. कंपनीने तिमाही निकाल जाहीर केले आहेत.
कधी आहे रेकॉर्ड डेट?
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला असून, कंपनी एका शेअरवर 3.50 रुपये लाभांश देत आहे. या लाभांशासाठी कंपनीने सोमवार, 25 नोव्हेंबर 2024 ही तारीख निश्चित केली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांचे नाव कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहील. त्यांना या लाभांशाचा लाभ मिळणार आहे. याआधी ऑगस्टमध्ये कंपनीने एक्स-डिव्हिडंड ट्रेड केला होता. तेव्हा कंपनीने प्रति शेअर 3.25 रुपये लाभांश दिला होता.
शेअर बाजारात कंपनीची कामगिरी
शुक्रवारी (ता.८) पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे शेअर्स 2.70 टक्क्यांच्या घसरणीसह 449.45 रुपयांवर बंद झाले. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या 2 वर्षात या सरकारी कंपनीने 372 टक्के परतावा दिला आहे. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्च स्तर 580.35 रुपये आणि 52 आठवड्यांचा निच्चांकी स्तर 265.65 रुपये आहे.
कंपनीने दोनदा दिले बोनस शेअर्स
दुसऱ्या आणि शेवटच्या वेळी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर्सचा एक्स-बोनस स्टॉक म्हणून 21 सप्टेंबर 2023 रोजी व्यवहार झाला. कंपनीने 4 शेअर्सवर 1 शेअर बोनस दिला होता. तसेच, त्यापूर्वी कंपनीने 2016 मध्ये बोनस शेअर्स दिले होते. तेव्हा कंपनीने एका शेअरवर एक शेअर बोनस दिला होता.
कंपनीच्या निव्वळ नफ्यात 9 टक्क्यांची वाढ
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 9 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 7214.90 कोटी रुपये होता. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 6628.17 कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकूण महसूल 25,754.73 कोटी रुपये होता.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)