हमीभाव कायद्यावरून राहुल गांधींची पलटी? लोकसभा निवडणूक घोषणापत्रात दिले होते आश्वासन!
१७ वी लोकसभा निवडणूक अनेक मुद्द्यांमुळे गाजली. विशेष म्हणजे या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना निवडणूक घोषणापत्रात भरीव स्थान दिल्याने कॉग्रेस पक्षाला चांगले यश देखील मिळाले. तर सत्ताधारी भाजपला मोठा फटका सहन करावा लागला. मात्र, आता काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना शेतकऱ्यांचा विसर पडलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता लोकसभा निवणुकीदरम्यान काँग्रेस पक्षाने हमीभाव कायद्यासाठी उगारलेली तलवार, म्यान झाली की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शेतकऱ्यांच्या मुद्द्यांमुळे काँग्रेस पक्षाला उभारी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेतेपदी विराजमान होत, आतापर्यंत लोकसभेत अनेक मुद्दे उचलून धरले. मात्र, यामध्ये शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना कुठेही स्थान दिल्याचे आढळून आले नाही. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर हमीभाव कायद्यासाठी शेतकऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले आहे. मात्र, असे असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षेच्या मुद्द्यावर भर दिला आहे. आणि नीट परीक्षेच्या मुद्द्यावर भर देणे योग्यही आहे. परंतु, ज्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांमुळे काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीत नवसंजीवनी मिळाली. त्या शेतकऱ्यांच्या हमीभाव कायद्यासह अन्य मुद्द्यांचा काँग्रेसला विसर पडला की काय? अशी कुजबुज सध्या शेती क्षेत्रातील जाणकारांमध्ये पाहायला मिळत आहे.
बैठकीत हमीभाव कायद्याचा विसर
दरम्यान उपलब्ध माहितीनुसार, लोकसभेच्या विशेष अधिवेशनाबाबत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी रात्री महत्वाची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी विरोधकांच्या मुद्द्यांवर मतदान केले. ज्यामध्ये नीट परीक्षा, अग्निवीर या विषयांसह महागाई तसेच किमान आधारभूत किमतींबाबत (एमएसपी) चर्चा झाली. त्यामुळे आता संसदेत हमीभाव कायद्याचा मुद्दा उचलून धरण्याबाबत काँग्रेस पक्ष मागे हटतोय की काय? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
कोणत्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होणार
राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी हमीभाव कायदयाच्या मुद्द्यावरून एनडीएची साथ सोडत, काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीची वाट धरली होती. याच हनुमान बेनीवाल यांनी खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर नीट परीक्षा, अग्निवीर, महागाई, एमएसपी दर हे इंडिया आघाडीचे विरोधाचे महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत, असे माध्यमांना सांगितले आहे. तसेच ईडी, सीबीआय यांसारख्या सरकारी एजन्सीचा गैरवापर हा देखील कळीचा मुद्दा असणार आहे. असे त्यांनी म्हटले आहे. परिणामी, आता हनुमान बेनीवाल यांच्या माहितीनंतर काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या एमएसपीसह हमीभाव कायदयाच्या मुद्द्यावरून पलटी मारत आहे की काय? या मुद्द्याला बळ मिळत आहे.