५ वर्षांनी ई-केवायसी अनिवार्य
केंद्र सरकार नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट (NFSA) अंतर्गत देशातील कोट्यवधी लोकांना सवलतीच्या दरात आणि मोफत रेशन पुरवत आहे. नवीन नियमांनुसार, रेशन कार्डसाठी दर ५ वर्षांनी एकदा ई-केवायसी करणे आवश्यक आहे. अनेक लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया २०१३ मध्ये किंवा त्यापूर्वी पूर्ण केली होती, त्यामुळे आता त्यांना माहिती अपडेट करणे बंधनकारक झाले आहे. आनंदाची बातमी अशी की, यासाठी आता सरकारी कार्यालयांत चकरा मारण्याची गरज नाही, कारण ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे.
तुमच्या स्मार्टफोनचा वापर करून तुम्ही काही मिनिटांतच ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यासाठी खालील टप्पे फॉलो करा:
१. ॲप डाऊनलोड करा: सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये ‘Mera KYC’ आणि ‘Aadhaar FaceRD’ हे दोन ॲप्स डाऊनलोड करा.
२. लोकेशन आणि आधार: ‘Mera KYC’ ॲप उघडा आणि तुमचे लोकेशन सेट करा. त्यानंतर तुमचा आधार नंबर आणि स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाका.
३. ओटीपी व्हेरिफिकेशन: तुमच्या आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल, तो टाकून पडताळणी पूर्ण करा.
४. माहिती तपासा: पडताळणीनंतर स्क्रीनवर तुमच्या आधारशी संबंधित सर्व माहिती दिसेल.
५. फेस ई-केवायसी (Face e-KYC): आता ‘Face e-KYC’ या पर्यायावर क्लिक करा. तुमच्या फोनचा फ्रंट कॅमेरा सुरू होईल. कॅमेऱ्यात पाहून तुमचा फोटो क्लिक करा.
६. सबमिट: जर फोटो स्पष्ट आणि योग्य आला असेल, तर सबमिट बटणावर क्लिक करा. यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
तुमचे ई-केवायसी यशस्वी झाले आहे की नाही, हे तपासण्यासाठी पुढील पद्धत वापरा:
‘Mera KYC’ ॲपवर जाऊन पुन्हा लोकेशन टाका.
आधार नंबर, कॅप्चा आणि ओटीपी टाकून लॉगिन करा.
स्टेटस स्क्रीनवर जर ‘Y’ दिसत असेल, तर तुमचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे. जर तेथे ‘N’ दिसत असेल, तर तुमची प्रक्रिया अजूनही प्रलंबित (Pending) आहे.
ज्यांना मोबाईल ॲपद्वारे प्रक्रिया करण्यात अडचण येत आहे, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही ऑफलाईन पद्धतीनेही हे काम करू शकता. त्यासाठी जवळच्या रेशन दुकानात (FPS) किंवा CSC (कॉमन सर्विस सेंटर) वर जा. सोबत आधार कार्ड आणि रेशन कार्ड घेऊन जा. तेथील कर्मचारी बायोमेट्रिक मशिनच्या मदतीने तुमची ई-केवायसी प्रक्रिया मोफत पूर्ण करून देतील. वेळेत ई-केवायसी पूर्ण करून आपले रेशन कार्ड सुरक्षित करा आणि मोफत धान्याचा लाभ घेत राहा.
हे देखील वाचा: PIB Fact Check: सरकार खरंच 1 किलो सोनं मोफत देतंय का? दाव्याचे सत्य सर्वांसमोर






