फक्त २ माणसांनी नोकरी बदलली आणि जगभरातील शेअर बाजार पत्त्यांसारखे कोसळले; टेक कंपन्यांचे अब्जावधी डॉलर्स एका रात्रीत पाण्यात ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
Why global stock market crashed June 2026 : गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच ‘एआय’ (Artificial Intelligence) बाबत प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. जगभरातील बड्या गुंतवणूकदारांनी डोळे झाकून या क्षेत्रात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. मात्र, २२ जून रोजी जागतिक बाजारपेठेत एक अशी अनपेक्षित आणि धक्कादायक घटना घडली, ज्याने संपूर्ण तंत्रज्ञान विश्वाला हादरवून सोडले. गुगलचे दोन सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिभावान एआय शास्त्रज्ञ नोआम शाझिर (Noam Shazeer) आणि जॉन जम्पर (John Jumper) यांनी कंपनी सोडल्याची घोषणा केली. या एका घोषणेमुळे जागतिक शेअर बाजारात घबराट पसरली आणि टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये ऐतिहासिक घसरण पाहायला मिळाली.
या दोन शास्त्रज्ञांच्या अचानक जाण्याने गुंतवणूकदारांचा गुगलवरील आणि एकूणच एआय क्षेत्रावरील विश्वास डगमगला. २२ जून रोजी शेअर बाजार उघडताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर शेअर्स विकायला सुरुवात केली. परिणामी, गुगलची मूळ कंपनी ‘अल्फाबेट’च्या (Alphabet) बाजार भांडवलात (Market Cap) सुमारे २७० अब्ज डॉलर्सची प्रचंड घट झाली. हा धक्का केवळ गुगलपुरता मर्यादित राहिला नाही; एआय चिप्स बनवणारी आघाडीची कंपनी ‘एनव्हिडिया’ला (Nvidia) तब्बल २०० अब्ज डॉलर्सचा फटका बसला. याशिवाय ॲमेझॉनचे शेअर्स ५ टक्क्यांनी, तर मेटाचे शेअर्स २ टक्क्यांनी घसरले. इलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ला (SpaceX) देखील मोठा फटका बसला असून त्यांच्या शेअर्समध्ये १६ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 1971 Surrender: ‘ढाक्यात 90,000 पाकिस्तानी सैनिकांच्या पँट लटकत…’; बलुच नेते अख्तर मेंगलनी लष्करप्रमुख आसिम मुनीरची काढली अब्रू
या महाघसरणीची सुरुवात १६ जून रोजी झाली, जेव्हा गुगलचे सर्वात प्रतिभावान संशोधक नोआम शाझिर यांनी गुगल सोडून ‘ओपन एआय’ (OpenAI) मध्ये सामील होत असल्याची घोषणा केली. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांत, म्हणजेच १९ जून रोजी, गुगलचे दुसरे प्रमुख शास्त्रज्ञ जॉन जम्पर यांनीही कंपनीला रामराम ठोकत ‘अँथ्रोपिक’ (Anthropic) या प्रतिस्पर्धी कंपनीत जाण्याचा निर्णय घेतला. २२ जून रोजी जेव्हा बाजार उघडला, तेव्हा गुगलच्या शेअर्समध्ये थेट ७.२ टक्क्यांची घसरण झाली.
नोआम शाझिर आणि जॉन जम्पर हे एआय उद्योगातील असे मोजके चेहरे आहेत, ज्यांच्या संशोधनावर आजचे संपूर्ण आधुनिक तंत्रज्ञान उभे आहे. नोआम शाझिर यांनी २०१७ मधील जगप्रसिद्ध ‘ट्रान्सफॉर्मर’ (Transformer) शोधनिबंधाचे सह-लेखन केले होते, जो आजच्या चॅटजीपीटी (ChatGPT) आणि इतर मोठ्या एआय मॉडेल्सचा मुख्य पाया आहे. धक्कादायक बाब म्हणजे, दोन वर्षांपूर्वी शाझिर यांना पुन्हा गुगलमध्ये आणण्यासाठी कंपनीने तब्बल २.७ अब्ज डॉलर्स खर्च केले होते. अशा परिस्थितीत त्यांनी कंपनी सोडल्यामुळे बाजारात असा संदेश गेला की, एआयच्या या वेगवान शर्यतीत गुगल कुठेतरी मागे पडत आहे.
या घटनेने केवळ दोन मोठ्या व्यक्तींच्या नोकरी बदलण्याचा प्रश्न उरलेला नाही, तर यामुळे संपूर्ण एआय उद्योगाच्या व्यावसायिक मॉडेलवरच (Business Model) मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुंतवणूकदारांना आता ही भीती सतावत आहे की, अब्जावधी डॉलर्सचे हे अथांग तंत्रज्ञान काय केवळ काही मोजक्या आणि निवडक लोकांच्या बुद्धिमत्तेवरच चालत आहे का? जर भविष्यात अशी महत्त्वाची प्रतिभा एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जात राहिली, तर कंपन्यांचे स्थैर्य धोक्यात येईल का? विशेष म्हणजे, हे दोन्ही शास्त्रज्ञ ज्या ‘ओपन एआय’ आणि ‘अँथ्रोपिक’ सारख्या कंपन्यांमध्ये गेले आहेत, त्या खाजगी असल्याने आणि शेअर बाजारात सूचीबद्ध (Listed) नसल्याने त्यांच्यावर या घसरणीचा कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 1971 Surrender: ‘ढाक्यात 90,000 पाकिस्तानी सैनिकांच्या पँट लटकत…’; बलुच नेते अख्तर मेंगलनी लष्करप्रमुख आसिम मुनीरची काढली अब्रू
सर्वात मोठा आणि कळीचा प्रश्न आता एआयच्या प्रत्यक्ष नफ्याबाबत (Profitability) विचारला जात आहे. मायक्रोसॉफ्ट, गुगल, मेटा आणि ॲमेझॉनसारख्या महाकाय कंपन्या नवीन एआय मॉडेल्स विकसित करण्यासाठी आणि अवाढव्य डेटा सेंटर्स उभारण्यासाठी दरमहा अब्जावधी डॉलर्सचा खर्च करत आहेत. मात्र, या प्रचंड खर्चाच्या तुलनेत एआयमधून मिळणारा महसूल अजूनही खूपच कमी आहे. गुंतवणूकदारांनी दीर्घकाळापासून ज्या मोठ्या नफ्याची अपेक्षा ठेवली होती, ती अद्याप पूर्ण झालेली नाही. परिणामी, जागतिक बाजारपेठ आता केवळ एआयच्या चमत्कारी क्षमतेवर भुलण्यास तयार नाही, तर ती त्याच्या प्रत्यक्ष आर्थिक फायद्यावर आणि नफ्यावर कडक प्रश्न विचारत आहे.






