फोटो सौजन्य - Social Media
“अपयश म्हणजे शेवट नव्हे, तर सुरुवातीचा एक टप्पा आहे” याची जाणीव करून देणारे अधिकारी म्हणजे IPS आकाश कुल्हारी! अभ्यासात मागे असलेला, कमी गुण मिळवणारा आणि शाळेतून काढून टाकलेला मुलगा देशाच्या पोलिस सेवेत वरिष्ठ पदावर पोहोचेल, हे कधी कोणाला वाटलेच नव्हते. पण आकाश कुल्हारी यांनी ही अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली.
राजस्थानातील बीकानेर जिल्ह्यात जन्मलेले आकाश हे सुरुवातीला अभ्यासात खूपच संथ होते. दहावीच्या परीक्षेत केवळ ५७% गुण मिळाले आणि शाळेने त्यांना अकरावीला प्रवेश नाकारला. तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना केंद्रीय विद्यालयात प्रवेश दिला. हाच टर्निंग पॉइंट ठरला. नवीन वातावरण, योग्य शिक्षक, आणि आत्मविश्वास वाढवणारे सहपाठी यामुळे त्यांनी मन लावून अभ्यास केला आणि १२वीमध्ये थेट ८५% गुण मिळवले.
यानंतर त्यांनी बीकानेरमधील दुग्गल कॉलेजमधून बीए पूर्ण केले. पुढे ते दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) एमएसाठी गेले आणि तिथेच त्यांनी यूपीएससीचा निर्णय घेतला. शिक्षण चालू असतानाच त्यांनी एमफिलसाठी प्रवेश घेतला आणि यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू ठेवली. २००५ मध्ये त्यांनी कठीण परीक्षेत यश मिळवून २७३ वी रँक प्राप्त केली आणि २००६ बॅचमधून IPS अधिकारी झाले. आज ते उत्तर प्रदेश कॅडरमध्ये IG (Public Grievance) या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत.
आकाश कुल्हारी यांची कथा ही त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक उदाहरण आहे जो अपयशामुळे स्वतःवरचा विश्वास गमावतो. त्यांचं जीवन शिकवते गुण कमी असतील, शाळा नाकारेल, पण जर मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोन टिकवून ठेवला, तर यश काही थांबत नाही. त्यांचा ही यशोगाथा अपयश मिळालेल्या त्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रेरणा आहे आणि आदर्श आहे. हार मिळाली म्हणून मागे हटू नका. आपल्याला जी गोष्ट मिळवायची आहे, त्यासाठी कठोर परिश्रम करत चला. तुमच्यासाठी लिहलेले यश नक्कीच तुमच्यात पदरात पडेल.