एक मुलगा, एक बदल आणि लिंग समभावाची जाणीव: मीना राजू मंचमुळे आदित्य बिलार्डचा प्रेरणादायी प्रवास
शाळेत मीना राजू मंचची सत्र सुरू झाल्यावरही तो सुरुवातीला सहभागी होण्यास तयार नव्हता. मुलींबरोबर एकत्र खेळणं, चर्चा करणं किंवा वैयक्तिक विषयांवर बोलणं त्याला अयोग्य वाटायचं. त्याच्या मते हे सर्व घरात आणि समाजात शिकवलेल्या गोष्टींविरुद्ध होते. अंगाई-युनिसेफतर्फे (UNGEI-UNICEF) लिंग समभाव हा विषय खेळाधारित शिक्षणाद्वारे किशोरवयीन मुले-मुली, शिक्षक आणि गावातील समुदायांना शिकवण्यात आला. मीना राजू मंच हा इयत्ता ६ ते ८ वीचे विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आला असून लिंग समभावाशी संबंधित विविध पैलूंची माहिती त्यांना करून देण्यात आली. त्यामध्ये संवाद, खेळ, चर्चा अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. या कार्यक्रमाला स्थानिक संस्था स्वयं शिक्षण प्रयोग (एसएसपी), कोरो आणि मावा यांचा सहभाग होता. त्यामध्ये शाळांसोबतच ग्रामपंचायत, गावातील लोक आदींनाही सहभागी करून घेण्यात आलं. देशात प्रथमच प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमात १२० शाळा, ८०० हून अधिक शिक्षक आणि सुमारे १८ हजार विद्यार्थी सहभागी झाले. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘मीना राजू मंच’च्या माध्यमातून लिंग समानतेचे विविध पैलू सुलभ पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले. राज्य शिक्षण विभागाच्या शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात आला.
पण कुतूहलामुळे आदित्य मीना राजू मंचच्या एका सत्राला गेला आणि तेथून त्याच्या विचारांमध्ये बदल होण्यास सुरुवात झाली. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला हा उपक्रम खेळ, भूमिकानाट्य, गोष्टी आणि चर्चांद्वारे लिंगभेद समजावतो. “ताई” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रशिक्षित स्वयंसेविका या सत्रांचे संचालन करतात. या माध्यमातून मुलांना लिंग, सामाजिक भूमिका, मासिक पाळी आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींचे हक्क यांसारख्या विषयांवर विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची संधी मिळते.
सुरुवातीला आदित्य शांतपणे निरीक्षण करत असे, चर्चा ऐकत असे. पण हळूहळू तो चर्चेत सहभागी होऊ लागला. त्याला समजले की पुरुषांनी स्वयंपाक करू नये किंवा मुलींनी शांत राहावे, हे नियम नैसर्गिक नाहीत. वर्गातील मुलींच्या अनुभवांमधून त्याला समजले की, शाळेनंतर त्यांना घरकाम करावे लागते, तर मुलांना मोकळा वेळ मिळतो. काही मुलींनी लवकर लग्नामुळे शिक्षण सोडलं असल्याचंही त्याने ऐकलं.
आदित्य सांगतो, “माझ्या मनात खूप प्रश्न होते. नातेसंबंध, जात याबाबत, तसंच समाज मुलगा-मुलगी यांच्यात फरक का करतो याबद्दल. घरी यावर कधी चर्चा झाली नव्हती. शाळेच्या अभ्यासक्रमातही हे विषय नव्हते. पण ताईंनी आम्हाला विचार करायला आणि प्रश्न विचारायला प्रोत्साहन दिले.” काही सत्रांनंतर त्याची भीती कमी झाली आणि उत्सुकता वाढली. त्याने घरात आणि गावात प्रश्न विचारायला सुरुवात केली. स्त्रिया जेवण वाढतात पण जेवायला सर्वात शेवटी का बसतात? मुलींचं लग्नानंतर शिक्षण का थांबतं? ट्रान्सजेंडर लोकांना आदर का मिळत नाही? असे अनेक प्रश्न तो मोकळेपणाने मांडू लागला.
शाळेत त्याच्या वागण्यातही बदल दिसू लागला. तो वर्गातील मुलींशी बोलू लागला, त्यांना अभ्यासात मदत करू लागला आणि मुलींच्याही गटामध्ये सहभागी होऊ लागला. हळूहळू इतर मुलांनीही त्याचे अनुकरण केलं. आज त्यांच्या वर्गात मुलं आणि मुली एकत्र बसतात, खेळतात आणि एकमेकांना मदत करतात. शिक्षकही आता सर्वसमावेशक वातावरणाला प्रोत्साहन देतात.
परंतु खरं आव्हान शाळेबाहेर होतं. गावातील काही मित्रांनी त्याची चेष्टा केली. “मुलीसारखे वागतोस” असे म्हणत त्याला टोमणे मारले. काहींनी त्याच्याशी बोलणंही बंद केलं. तो म्हणतो, “आपल्या समाजात पुरुषांनी कायम विशिष्ट पद्धतीने वागणं अपेक्षित असतं. मी त्यांना घरकाम करता का, असा प्रश्न विचारतो तेव्हा त्यांना ते कमकुवतपणाचं लक्षण वाटतं.” तरीही आदित्य आपल्या नव्या विचारांवर ठाम राहिला. त्याने स्वतः घरकाम करायला सुरुवात केली. झाडू मारणं, भांडी घासणं, साधं जेवण बनवणं, वगैरे. तो म्हणतो, “काम हे काम असतं. त्याचं स्त्री-पुरुष असं काहीच संबंध नसतो.”
Exclusive Series : मुली-महिलांवरील अन्याय थांबवण्यासाठी आयपीएस अधिकारी होण्याचे आरतीचे स्वप्नं
लिंग समभावाचे सुरुवातीचे धडे गिरवल्यावर आता आदित्यचं आयुष्यातलं स्वप्नं मोठं आहे. त्याला आयएएस अधिकारी बनून लिंग समभावाच्या अंमलबजावणीसाठी धोरणं तयार करायचे आहे. तो म्हणतो, “जागरूकता महत्त्वाची आहे. पण सर्वांसाठी धोरणं आणि त्यांची अंमलबजावणी आवश्यक आहे.” तो सध्या शिक्षणासाठी धाराशिवमध्ये काकांसोबत राहतो, तर त्याचे आई-वडील सोलापूरमध्ये आहेत. शारीरिक मर्यादा असूनही त्याने आपल्या अभ्यासात कधी खंड पडू दिला नाही. तो म्हणतो, “ मीना राजू मंचच्या ताईंनी आम्हाला जगाची खरी ओळख करून दिली. त्यांनी विचार करायला, संवेदनशील राहायला आणि योग्य कृती करायला शिकवले.” आदित्यची गोष्ट सांगते की बदल केवळ गाजावाजा करून होत नाहीत. ते खूप विचारमंथनातून शांतपणे, हळूहळू होत असतात. या मुलांसाठी वर्गातले लहानसहान खेळ हे लिंग समभावासारख्या मोठ्या विचाराकडे घेऊन गेले. त्यातही आदित्यसारख्या मुलांनी आपले विचार सर्वांसमोर मांडण्याचं दाखवलेलं धाडस आणि इच्छाशक्ती यातून या विचारांची अंमलबजावणी सुरू झाली आणि बदलाची नांदीही.
संकलनः श्रुति गणपत्ये, माध्यम सल्लागार, युनिसेफ महाराष्ट्र






