Ashok Kharat case: अशोक खरातच्या जीवाला धोका! नाशिकरोड जेल आणि प्रवासात हल्ल्याची भीती; सरकारी वकिलांचा न्यायालयात दावा
Ashok Kharat case: लैंगिक शोषण आणि धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी अशोक खरात याच्या जीवाला नाशिकरोड सेंट्रल जेलमध्ये आणि प्रवासात गंभीर धोका असल्याचा खळबळजनक दावा सरकारी वकिलांनी न्यायालयात केला आहे. या सुरक्षेच्या कारणास्तव खरातला त्वरित पुढील गुन्ह्यात वर्ग करण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली असून, आता खरातचा ताबा पुन्हा एकदा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) सोपवण्यात आला आहे.
जेव्हा न्यायालयाने वर्ग करण्याच्या अर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तेव्हा सरकारी वकील शैलेंद्र बगाडे आणि किरण बेडभर यांनी गंभीर सुरक्षेचा मुद्दा मांडला. सुरक्षेच्या कारणास्तव खरातला प्रत्यक्ष न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात येते, याकडे सरकारी वकीलांनी लक्ष वैधले, न्यायालयाने जेव्हा विचारले की नेमका धोका कुठे आहे? तेव्हा अॅड, बगाडे यांनी स्पष्ट केले की, आरोपीला न्यायालयात आणताना आणि तुरुंगात ठेवताना अशा दोन्ही ठिकाणी त्याच्या जीवितास धोका आहे. सरकारी वकिलांनी न्यायालयाला माहिती दिली की, यापूर्वीच्या गुन्ह्यांमध्येही खरातला रात्रभर तुरुंगात ठेवले गेलेले नाही. केवळ कागदोपत्री पूर्ततेसाठी त्याला अर्ध्या तासासाठी तुरुगात नेले जाते आणि त्यानंतर लगेच एसआयटी त्याचा ताबा घेते. (Nashik Crime News)
अशोक खरात याला तरुणीचे लैंगिक शोषण आणि पालकांना जीवे मारण्याची धमकी देण्याच्या गुन्ह्यामध्ये तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर रविवारी (दि. २६) न्यायालयात हजर करण्यात आले होते, न्यायालयाने या प्रकरणात त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र, एसआयटीने खरातला तात्काळ पुढील गुन्ह्यात वर्ग करण्यासाठी अर्ज सादर केला. सुरुवातीला न्यायालयाने सुट्टीचे कोर्ट’ असल्याचे कारण देत यावर आदेश देण्यास असमर्थता दर्शविली होती.
Beed Crime: पत्नीच्या आक्षेपार्ह फोटोवरून वाद; मित्रांकडून 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या,
सरकारी पक्षाचा हा युक्तिवाद आणि सुरक्षेची गंभीरता लक्षात घेऊन न्यायालयाने अशोक खरातला पुढील गुन्ह्यात वर्ग करण्यास मंजुरी दिली. आरोपीच्या जीवाला धोका असल्याचे सांगत सरकारी पक्षाने मांडलेला मुद्दा न्यायालयाने गंभीरपणे घेतला. त्यामुळेच आजच कारागृह प्रक्रिया पूर्ण करून एसआयटी खरातचा ताबा घेणार आहे. एसआयटी रविवारी रात्रीपर्यंत नवीन गुन्ह्यात ताबा प्रक्रिया पूर्ण करेल, त्यानंतर, उद्या (सोमवारी) अशोक खरातला पुन्हा न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयीन कोठडीसाठी आग्रह धरला होता, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव यावेळी पुन्हा खरात पोलिस कोठडीतच राहिला.






