कॅनडाने परदेशी विद्यार्थ्यांसाठी एक धक्कादायक घोषणा केली आहे. कॅनडाकडून ‘स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम’ (SDS) व्हिसा योजना संपल्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णामागील कारण हे कॅनडाच्या वाढत्या गृह संकटाशी सामना करण्याची समस्या आणि संसाधनांचा अभाव असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. परंतु कॅनडाने घेतलेल्या निर्णयामुळे मात्र, भारतीय विद्यार्थ्यांना मोठी समस्या निर्माण होणार आहे. आता भारतीय विद्यार्थ्यांना कॅनडाचा व्हिसा मिळवण्यासाठी मोठ्या प्रक्रियेतून जावे लागणार आहे.
14 देशातील विद्यार्थ्यांना बसणार मोठा फटका
कॅनडाच्या या स्टुडंट डायरेक्ट स्ट्रीम (SDS ) व्हिसा योजनेअंतर्गत, भारत, ब्राझील, चीन,पाकिस्तान, कोस्टा रिका, मोरोक्को, कोलंबिया, पेरू अशा एकूण 14 देशांतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व्हिसा अर्ज प्रक्रिया जलद आणि सोपी करण्यात आली होती. आता ही योजना बंद झाल्याने या देशातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसणार असून विद्यार्थ्यांच्या व्हिसा प्रक्रियेला अधिक वेळ लागणार आहे.
कॅनडाच्या सरकारकडून त्यांच्या वेबसाइटवर व्हिसा कार्यक्रम बंद झाल्याची घोषणा केली गेली त्यात नमूद केले की, “कार्यक्रम मजबूत करण्यासाठी, विद्यार्थ्यांची सुरक्षा वाढवण्यासाठी आणि समान संधी प्रदान करण्यासाठी” हा निर्णय घेण्यात आला आहे. 8 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत (ईटी) प्राप्त झालेल्या सर्व अर्जांवर या योजनेंतर्गत कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. त्याच वेळी, त्यानंतरच्या सर्व अर्जांवर केवळ रेगुलर स्टडी परमिट स्ट्रीम प्रक्रियेअंतर्गत प्रक्रिया केली जाईल.
भारतीय विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम
मुळात कॅनडाच्या SDS व्हिसा कार्यक्रमामुळे व्हिसासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय जलद आणि अत्यंत सोपी होती. त्यामुळे असंख्य भारतीय विद्यार्थ्यांनी या व्हिसा कार्यक्रमाचा लाभ घेतला आणि कॅनडामधील नामांकित शिक्षण संस्थेत नोंदणी केली होती. त्याच वेळी, हा व्हिसा कार्यक्रम आता बंद झाल्याने, भारतीय विद्यार्थ्यांना कॅनडातील व्हिसासाठी सामान्य व्हिसा प्रक्रियेला सामोरे जावे लागेल, जी जास्त वेळकाढू आणि दीर्घ प्रक्रिया असू शकते. एसडीएस व्हिसा कार्यक्रमाचा स्वीकृती दर खूप जास्त होता. आता विद्यार्थ्यांना व्हिसासाठी आणखी कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे सहज व्हिसा मिळण्याच्या शक्यतांवर परिणाम होऊ शकतो.
आगामी कॅनडा निवडणूक लक्षात ठेऊन निर्णय
जनतेचे मत आहे की, कॅनडामध्ये खूप जास्त स्थलांतरित झाले आहेत. या जनतेच्या मतानुसार सरकारनेही तात्काळ पाऊले उचलत हा निर्णय घेतल्याचा बोलले जात आहे. त्यामुळे एसडीएस व्हिसा कार्यक्रम हा संपुष्टात आणण्याचा हा निर्णय घेण्यात आल्याचे समजले जात आहे. हा मुद्दा आगामी कॅनडातील निवडणुकांमध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणून सत्ताधारी पक्ष जनतेसमोर मांडू शकतो.