फोटो सौजन्य - Social Media
सावन वैश्य | नवी मुंबई : शासकीय अधिकारी असल्याचे भासवून तसेच बनावट ‘डिजिटल अरेस्ट’चा धाक दाखवत नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला नवी मुंबई गुन्हे शाखेच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातमधून अटक केली आहे. या आरोपीने एका फिर्यादीची तब्बल ₹९ लाख ४८ हजार १८० रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२६ दरम्यान आरोपीने फिर्यादीशी व्हॉट्सअॅप व सिग्नल अॅपद्वारे संपर्क साधून स्वतःला आरबीआय आणि एटीएसशी संबंधित अधिकारी असल्याचे भासवले. फिर्यादीला बनावट कागदपत्रे पाठवून अटकेची व कायदेशीर कारवाईची भीती दाखवत विविध बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पाडले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपासाद्वारे आरोपीचा शोध घेत उंगण विजयभाई लाकोड (वय २४, रा. अहमदाबाद, गुजरात) याला ३ जून रोजी वडोदरा येथून अटक करण्यात आली. तपासादरम्यान आरोपीकडून विविध कंपन्यांची ३४७ सिमकार्ड, ३ मोबाईल फोन, २ डेबिट कार्ड, ६ चेकबुक, १ पासबुक आणि २ आधार कार्ड जप्त करण्यात आले. चौकशीत आरोपीने हजारो सिमकार्ड सक्रिय करून त्यांचा वापर परदेशात, विशेषतः कंबोडियामध्ये सुरू असलेल्या ऑनलाइन फसवणूक रॅकेटसाठी केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पोलीसांचे आवाहन : पोलीस, सीबीआय, आरबीआय किंवा कोणतीही शासकीय यंत्रणा फोन किंवा व्हिडिओ कॉलद्वारे ‘डिजिटल अरेस्ट’ करत नाही. अशा प्रकारचे कॉल, संदेश किंवा बनावट कागदपत्रांवर विश्वास ठेवू नये. संशयास्पद प्रकार आढळल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधावा.






