कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे १०५ टीएमसी इतकी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरते त्या काळात हा परिसर निसर्ग सौंदर्याने बहरलेला दिसतो. हिरवाईने नटलेले डोंगर, विस्तीर्ण जलाशय आणि बोटींची वर्दळ यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर पर्यटन फुलते. मात्र दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात पाण्याची पातळी घटू लागल्यानंतर शिवसागर जलाशयाचे चित्र पूर्णपणे बदलते. पाणी आटल्याने परिसर ओसाड आणि विराण दिसू लागतो.
या भागातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह पर्यटन आणि बोट व्यवसायावर अवलंबून आहे. बोट वाहतूक बंद झाल्याने त्यांच्या रोजगारावर थेट परिणाम झाला असून आर्थिक संकट उभे राहिले आहे. तसेच कांदाटी खोरे, सोळशी खोरे, खरोशी-रेणोशी खोरे या दुर्गम भागांतील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पूर्वी जलमार्गाने सहज पोहोचता येणाऱ्या ठिकाणी आता नागरिकांना मैलोनमैल पायपीट करून बामणोली किंवा तापोळा बाजारपेठ गाठावी लागत आहे. त्यानंतर सातारा किंवा महाबळेश्वरकडे पुढील प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
जलाशयातील पाणी पातळी घटल्याने अनेक वर्षांपासून पाण्याखाली गेलेली जुनी गावे, घरांचे अवशेष तसेच मंदिरांचे भग्नावशेष पुन्हा दिसू लागले आहेत. त्यामुळे परिसरात पुनर्वसित झालेल्या गावांतील नागरिक आपल्या जुन्या गावांना भेटी देत आहेत. अनेक जण आपल्या पूर्वीच्या घरांचे अवशेष आणि मंदिरांचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.
Washim News : वाशिम जिल्ह्यातील ७६८ शेतकरी गटांचा फार्मर ग्रुप लीग स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग






