टेट–२०२५ परीक्षेसाठी एनसीएल प्रमाणपत्राबाबत सवलत (फोटो - istockphoto)
टेट–२०२५ चे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यास परवानगी देण्यात येणार
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांची माहिती
वैध एनसीएल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक
पुणे: शिक्षक (Teacher) अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा टेट–२०२५ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना दिलासादायक निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ज्या उमेदवारांनी नॉन-क्रिमी लेयर (एनसीएल) प्रमाणपत्र काढण्यासाठी संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज केलेला आहे, मात्र अद्याप प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही, अशा उमेदवारांना पोचपावती आधारे टेट–२०२५ चे ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यास परवानगी देण्यात येणार आहे. अशी माहीती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्राव्दारे दिली.
या संदर्भात स्पष्ट करण्यात आले आहे की, पोहोच पावतीवरील दिनांक हा आवेदनपत्र भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत, म्हणजेच १४ मे २०२५ पर्यंतचा असणे आवश्यक आहे. या कालावधीत जारी झालेली पोहोचपावती वैध धरली जाणार असून, त्याच्या आधारे उमेदवारांना अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
उमेदवारांनी अर्ज भरताना पोचपावती अपलोड करणे, तसेच अंतिम भरती प्रक्रियेपूर्वी वैध एनसीएल प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता वेळेत न केल्यास उमेदवाराचा दावा बाद होऊ शकतो, याची दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. या निर्णयामुळे टेट–२०२५ साठी अर्ज करणाऱ्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला असून, शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि समान संधी मिळण्यास मदत होणार आहे.
महत्त्वाचे
या पोहोच पावतीच्या आधारे पुढे प्राप्त होणारे एनसीएल प्रमाणपत्र हे टेट–२०२५ परीक्षेच्या माध्यमातून होणाऱ्या पुढील भरती प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे एनसीएल प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असलेल्या उमेदवारांचा अर्ज प्रक्रियेत कोणताही अडथळा येणार नाही, असा दिलासा प्रशासनाने दिला आहे.






