फोटो सौजन्य - Social Media
मानसिक आरोग्य क्षेत्रात परिवर्तन घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या संस्थापिका आणि अध्यक्षा नीरजा बिर्ला यांनी एमपॉवरिंग माइंड्स समिट 2025 मध्ये ग्लोबल मेंटल हेल्थ कन्सोर्टियम सुरू करण्याची घोषणा केली. या उपक्रमाद्वारे भारत व आंतरराष्ट्रीय स्तरावर मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी पद्धतशीर बदल घडवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. समिटमध्ये हार्वर्ड मेडिकल स्कूल, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, मेंटल हेल्थ फर्स्ट एड (एमएचएफए) ऑस्ट्रेलियाचे तज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, शिक्षक, धोरणकर्ते एकत्र आले. त्यांनी भारतातील तरुणांमध्ये वाढत्या मानसिक आरोग्य समस्यांवर उपाय शोधण्यावर भर दिला.
नीरजा बिर्ला यांच्या हस्ते “अनवेलिंग द सायलंट स्ट्रगल: एमपॉवर रिसर्च रिपोर्ट” चे अनावरण करण्यात आले. या अहवालात महाविद्यालयीन तरुणांमध्ये वाढणाऱ्या मानसिक आरोग्य समस्यांचा आढावा घेण्यात आला. संशोधनानुसार, 38% विद्यार्थ्यांना शैक्षणिक तणाव जाणवतो, 50% च्या शैक्षणिक कामगिरीवर परिणाम होतो, 41% सामाजिक अलगीकरण अनुभवतात, तर 47% झोपेच्या समस्यांनी ग्रस्त असतात. तसेच, 8.7% विद्यार्थ्यांनी शैक्षणिक दबावामुळे आत्महत्येचा विचार केला आहे, मात्र फक्त 2% व्यावसायिक मदत घेतात.
समिटमध्ये महाराष्ट्र सरकारचे उद्योग मंत्री उदय सामंत, आरोग्य सचिव निपुण विनायक, तसेच मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भाविस्कर उपस्थित होते. नीरजा बिर्ला म्हणाल्या, “भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी मानसिक आरोग्याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. एमपॉवरिंग माइंड्स समिट हे या परिवर्तनाची सुरुवात आहे.”
एमपॉवरिंग माइंड्स समिट 2025 मध्ये मानसिक आरोग्याच्या महत्त्वावर भर देताना, हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या डॉ. ब्लेझ् अग्युरे यांनी किशोरवयीन मानसिक आरोग्य संकटाच्या वाढत्या गांभीर्याबाबत भाष्य केले. तसेच, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या डॉ. श्याम बिशेन यांनी मानसिक आरोग्य केवळ आरोग्यसेवेपुरते मर्यादित न ठेवता, ते सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक घटक असल्याचे स्पष्ट केले.
या समिटच्या माध्यमातून मानसिक आरोग्यासाठी धोरणात्मक बदल घडविणे, लवकर हस्तक्षेप मॉडेल विकसित करणे आणि आंतर-क्षेत्रीय क्षमता बांधणी बळकट करण्यावर भर देण्यात आला. ग्लोबल मेंटल हेल्थ कन्सोर्टियम या नव्या उपक्रमाद्वारे, भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर मानसिक आरोग्याला सार्वजनिक आरोग्य धोरणात प्राधान्य देण्यासाठी एक व्यापक मंच उपलब्ध होणार आहे. या उपक्रमातून मानसिक आरोग्याशी संबंधित धोरणे आकारली जातील आणि जागतिक स्तरावर तज्ज्ञ, संशोधक आणि धोरणकर्त्यांना एकत्र आणले जाईल.