फोटो सौजन्य- सोशल मीडिया
राज्यातील असंख्य विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी तयारी करतात. मात्र प्रत्येकालाच राज्यातील महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळतोच असे नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी परराज्यात जातात अथवा परदेशामध्ये शिक्षण घेतात. तसेच राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीनेही वैद्यकीय महाविद्यालयाची संख्या वाढणे आवश्यक होते. त्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात होते. आता मात्र विद्यार्थ्यांच्या आणि राज्याच्यादृष्टीने महत्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रामध्ये ८ नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे.
राज्य शासनाच्या पाठपुराव्यामुळे राज्यात नवीन ८ वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रयत्नाने मुंबई, नाशिक, गडचिरोली, अमरावती, वाशिम, जालना, बुलडाणा, अंबरनाथ, भंडारा, आणि हिंगोली अशा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी मिळाली आहे. या आठ महाविद्यालयात एकूण ८०० विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळणार आहे.
दरवर्षी ४८५० विद्यार्थ्यांना मिळणार वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश
प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय असावे असे शासनाचे धोरण आहे. सध्या राज्यात एकूण ३५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत.त्यामुळे या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दरवर्षी ४८५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. राज्यातील अनेक विद्यार्थी हे प्रचंड खर्च करुन विविध देशांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जात होते. विद्यार्थी संख्या वाढल्याने आता विद्यार्थी राज्यातच शिक्षण घेऊ शकतात.
प्रत्येक महाविद्यालयास ४०३ कोटी रुपये
या महाविद्यालयांच्या बांधकामाकरिता व इतर आवश्यक साधनसामुग्रीसाठी प्रत्येक महाविद्यालयास ४०३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे बांधकाम दर्जेदार, गुणवत्तापूर्वक होण्यासाठी केंद्र शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत कामे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सद्यस्थितीत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमामार्फत महाविद्यालयाची बांधकाम निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच बांधकामे सुरू करण्यात येणार आहे.
एमबीबीएसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अतिशय आनंद देणारी ठरणार आहे. मुख्यत: वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये सुरु होणाऱ्या महाविद्यालयांमुळे तेथील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच या महाविद्यालयाद्वारे लोकांची आरोग्यसेवाही केली जाणार असल्याने लोकांनाही त्याचा प्रचंड लाभ होणार आहे.