फोटो सौजन्य- सोशल मीडिया
IIT Delhi Gig Workers Study: भारतातील बहुतांश राज्यामध्ये सध्या प्रचंड उष्णता जाणवत आहे. काही राज्यामध्ये तापमान इतके प्रचंड आहे की, दुपार आणि सायंकाळचे बाहेर पडणेसुद्धा अवघड होत आहे. अशा तापमानात दिवसभर बाहेर रहावे लागले तर किती कठीण होईल. परंतु, ‘गिग वर्कर्स’ (डिलिव्हरी बॉईज, चालक इ.) नेमकी याच प्रकारची नोकरी करत आहेत. या भीषण उष्णतेत गिग वर्कर्स तासन्तास काम करत आहेत. या कामगांरांबाबत आयआयटी दिल्लीच्या एका अभ्यासात खुलासा करण्यात आला आहे.
या अभ्यासानुसार गिग वर्कर्स १२ तासांपेक्षा जास्त काम करतात. त्यांना आपला जास्तीत जास्त वेळ बाहेर कडक उन्हात घालवावा लागतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. थकवा येणे, डोकेदुखी, अंगावर उष्णतेचे पुरळ उठणे अशा समस्यांना सामोरे जावे असून त्यांनी अशाच प्रकारे काम सुरु ठेवले तर ते त्यांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका ठरू शकतो.
आयआयटी दिल्लीच्या ‘ट्रान्सपोर्टेशन रिसर्च अँड इंज्युरी प्रिव्हेंशन सेंटर’ने (TRIP) गिग वर्कर्सबाबत केलेल्या संशोधनात हे कठोर सत्य समोर आले आहे. त्यामुळे या संशोधन पथकाने अशी शिफारस केली आहे की, गिग वर्कर्सचा अधिकृतपणे आउटडोर वर्कर्स (बाहेर काम करणारे कामगार) या श्रेणीत समावेश करून त्यांच्यासाठी रस्ते सुरक्षा, उष्णतेपासून संरक्षण आणि कामाचे तास निश्चित करण्यासारखे नियम बनवले पाहिजेत.
दिल्लीत तापमान ४५ अंशावर पोहोचले असून उष्ण लहरी वाहत आहेत तरीही हे डिलिव्हरी वर्कर्स बाईक किंवा स्कूटीवरून वेगाने डिलिव्हरी करत आहेत. १२ ते १४ तास काम करून जास्तीत जास्त वेळ हे उन्हात घालवत असतात. या अहवालानुसार, हे गिग वर्कर्स महिन्यातून केवळ दोनच सुट्ट्या घेत आहेत आणि अवघ्या १० मिनिटांत डिलिव्हरी करून महिन्याला २५ ते २८ हजार रुपयांची कमाई करत आहेत.






