फोटो सौजन्य- सोशल मीडिया
IIT Teacher Shortage: एका बाजूला देशातील प्रतिष्ठित ‘भारतीय तंत्रज्ञान संस्था’ (IIT) नवीन कोर्सेस सुरू करत आहेत, विद्यार्थ्यांची क्षमता वाढवत आहेत आणि संशोधन उपक्रमांचा विस्तार करत आहेत; तर दुसरीकडे या संस्था शिक्षकांच्या प्रचंड टंचाईशी झुंजत आहेत. अधिकृत आकडेवारीनुसार, देशातील २३ आयआयटींमध्ये प्राध्यापकांची हजारो पदे अद्यापही रिकामी आहेत. त्यामुळे अध्यापन, संशोधन आणि नवीन शैक्षणिक कार्यक्रमांच्या संचालनावर याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
केंद्राच्या अहवालानुसार, देशातील सर्व २३ आयआयटींमध्ये मंजूर असलेल्या १२,००० हून अधिक प्राध्यापकांच्या पदांपैकी ४,३०० हून अधिक पदे रिक्त आहेत. म्हणजेच एकूण मंजूर पदांपैकी सुमारे ३८.४ टक्के पदे खाली आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे तर, दर पाचपैकी सुमारे दोन शिक्षकांची पदे अद्याप भरली गेलेली नाहीत.
अहवालानुसार, प्राध्यापकांची सर्वात जास्त टंचाई आयआयटी पाटणा आणि आयआयटी खरगपूर येथे नोंदवली गेली आहे. आयआयटी पाटणामध्ये ५४.६ टक्के तर आयआयटी खरगपूरमध्ये ५१.३ टक्के पदे रिक्त आहेत. याशिवाय इतर १२ आयआयटी अशा आहेत, जिथे एक-तृतीयांशपेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिकामी पडून आहेत.
तथापि, काही नवीन आयआयटींमध्ये ही स्थिती तुलनेने चांगली आहे. उदाहरणार्थ, आयआयटी धारवाड (१.७%), आयआयटी पालक्काड (५.८८%), आयआयटी रोपर (१४.३५%), आयआयटी तिरुपती (१४.३८%) आणि आयआयटी भिलाई येथे १५.१ टक्के पदे रिक्त आहेत.
देशभरातील आयआयटी आपल्या शैक्षणिक उपक्रमांचा सातत्याने विस्तार करत आहेत. संस्थांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), डिझाइन, पब्लिक पॉलिसी यांसारखे नवीन आणि विशेष अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. यासोबतच सरकार २०२८-२९ पर्यंत आयआयटीमध्ये सुमारे ६,५०० नवीन जागा जोडण्याच्या योजनेवर काम करत आहे.
सध्या देशातील सर्व आयआयटी मिळून १.३५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा वेळी शिक्षकांची कमतरता हे मोठे आव्हान मानले जात असून, यामुळे अध्यापन, संशोधन आणि नवीन कोर्सेस चालवण्यावर ताण वाढू शकतो.
आयआयटीच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, पदे रिक्त राहण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जागतिक पातळीवर योग्य संशोधक आणि शिक्षकांसाठी असलेली प्रचंड स्पर्धा हे आहे.
आयआयटींना जगातील अव्वल विद्यापीठे, बहुराष्ट्रीय संशोधन आणि विकास संस्था तसेच डीप-टेक स्टार्टअप्सशी स्पर्धा करावी लागते. तिथे उत्तम संधी आणि वेतन मिळत असल्याने अनेक पात्र पीएचड उमेदवार तिकडे वळतात.
याशिवाय, आयआयटीची भरती प्रक्रिया अत्यंत निवडक आणि गुणवत्तेवर आधारित असते. संस्था केवळ पूर्णपणे पात्र उमेदवारांचीच निवड करू इच्छितात आणि गुणवत्तेशी तडजोड करण्याऐवजी योग्य उमेदवार मिळेपर्यंत पदे रिक्त ठेवणे पसंत करतात.






