फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Google Job Selection process: जगभरातील अव्वल टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या ‘गूगल’ मध्ये काम करण्याचे स्वप्न लाखो लोक पाहतात, पण मोजक्याच लोकांना हे स्वप्न पूर्ण करता येते. जगभरातील विविध देशांमध्ये गूगलची कार्यालये असून तिथे वेळोवेळी नोकरभरती केली जाते. अनेक विद्यार्थी १२ वी पूर्ण झाल्यानंतर गूगलमध्ये नोकरी मिळवण्याचे ध्येय ठेवतात, तर लाखो पदवीधर आणि पदव्युत्तर उमेदवारही इथे नोकरीसाठी अर्ज करत असतात. गूगल आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या पगारासोबतच अनेक विशेष सुविधा देते, त्यामुळेच ही कंपनी जगभरात प्रसिद्ध आहे.
जर तुम्हालाही गूगलमध्ये नोकरी मिळवायची असेल, तर गूगलच्या रिक्रुटरने दिलेल्या ३ टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा रिझ्युमे अधिक प्रभावी बनवू शकता, ज्यामुळे तुम्हाला गूगलमध्ये नोकरी मिळण्याची शक्यता खूप वाढेल.
गूगलच्या डब्लिन ऑफिसमधील रिक्रुटर अमांडा असून यांनी एक उत्तम रिझ्युमे कसा बनवावा, याच्या तीन अत्यंत महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत. तुमचा अर्ज इतरांपेक्षा वेगळा आणि खास कसा बनवता येईल, याबद्दल त्यांनी स्वतः मार्गदर्शन केले आहे.
अमांडा यांनी दिलेला पहिला सल्ला म्हणजे, तुमचा रिझ्युमे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात, त्या पदाच्या ‘जॉब डिस्क्रिप्शन’ नुसार असावा. जुन्या कंपनीत तुम्ही काय जबाबदाऱ्या पार पाडल्या हे फक्त सांगण्याऐवजी, तुमचे कौशल्य आणि अनुभव त्या विशिष्ट पदाशी कसे जुळतात, हे स्पष्ट केले पाहिजे. तसेच, तुमच्या कामाचे संख्यात्मक परिणाम रिझ्युमेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करा.
उदाहरणार्थ: “मी एका टीमचे नेतृत्व केले” असे लिहिण्याऐवजी, त्या टीमचा आकार किती होता आणि तुमच्या नेतृत्वामुळे कंपनीला काय फायदा झाला/काय परिणाम झाला, हे आकडेवारीसह स्पष्ट करा. यामुळे रिक्रुटरला तुमच्या कामगिरीचा अंदाज लावणे सोपे जाते.
दुसऱ्या टिपमध्ये अमांडा सांगतात की, उमेदवारांनी त्या पदासाठी लागणाऱ्या किमान आवश्यक पात्रतेचा रिझ्युमेमध्ये अगदी स्पष्टपणे उल्लेख करावा. तुम्ही ज्या रोलसाठी अर्ज करत आहात, त्याशी संबंधित पात्रता रिझ्युमे पाहताच लगेच नजरेत भरली पाहिजे. जर रिक्रुटरला ती शोधून काढावी लागली, तर रिझ्युमे स्क्रिनिंग दरम्यान तुमच्या अर्जाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली फास्ट ट्रॅक कोर्टबाबत मोठी घोषणा! Fast Track Court म्हणजे नेमकं काय?
तिसऱ्या आणि शेवटच्या सल्ल्यामध्ये अमांडा यांनी रिझ्युमे अतिशय स्वच्छ, स्पष्ट आणि संक्षिप्त ठेवण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की, गूगलच्या रिक्रुटर्सना दररोज हजारो अर्जांची छाननी करावी लागते. त्यामुळे जो रिझ्युमे वाचायला सोपा असतो आणि ज्यामध्ये ठोस यश व अचूक माहिती दिलेली असते, अशा अर्जांकडे रिक्रुटर्सचे लक्ष सर्वात आधी जाते.






