फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Mumbai Job Ad Controversy : सध्या सोशल मीडियावर नवा वाद पेटला आहे. यामध्ये नोकरी डॉट कॉम आणि लिंक्डइनवरील जाहिरातीमध्ये मराठी उमेदवारांना डावलल्याचा आरोप केला जातोय. या जाहिरातीमध्ये फक्त गुजराती-मारवाडी अर्ज करू शकतात, असा उल्लेख केला असल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबईतील या नोकरीसाठी फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या वादग्रस्त जाहिरातीवर अहमदाबादस्थित भरती एजन्सीकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. यामध्ये कंपनीचे म्हणणं आहे की, आमची कंपनी ही रिक्रुटमेंट कंपनी आहे. प्लेसमेंट देण्याच काम आमच्या कंपनीकडून करण्यात येत असून विविध कंपन्यांच्या विविध पदांवर त्यांच्या गरजेनुसार पद भरायची असतात.
येथे काम करणारे कर्मचारीही वेगवेगळ्या भागांतून आले असून विविध भाषा बोलणारे आहेत. त्यामुळे या जाहीरातींचा वेगळा अर्थ घेऊ नये, कंपन्यांच्या गरजेनुसार त्या पादांसाठी भाषेची गरज पाहून तशा प्रकारची जाहिरात दिली आहे.
EGM आणि अकाउंट्स फायनान्स पदासाठी भरती प्रक्रिया राबण्यात येत आहे. यासाठीची जाहिरात अहमदाबादस्थित भरती एजन्सीकडून नोकरी डॉट कॉम आणि लिंक्डइनवर पब्लिश करण्यात आली आहे. या पोस्टसाठी 20 ते 25 लाखांचे आकर्षक वार्षिक वेतन दिले जाणार आहे. ही नोकरी मुंबईत असून या नोकरीसाठी गुजराती – मारवाडी भाषिक अर्ज करू शकतात. असा उल्लेख करण्यात आला आहे, त्यामुळे हा वाद पेटला आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर या जाहिरातीबद्दल संतापाची लाट उसळली असून मुंबईकर मराठी तरूणांनी जायच कुठे? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. रोजगार प्रक्रियेत भाषिक भेदभावाचा आरोप करण्यात आला आहे. जाहिरातीमुळे पुन्हा भाषिक वाद उसळण्याची शक्यता आहे. तसेच ही जाहिरात ज्या कंपनीची आहे, त्या संबंधित कंपनी आणि भरती एजन्सीवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.






