कर्जत/ संतोष पेरणे :
“लहरों से डरकर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती”
प्रयत्न केला तर सारं काही शक्य आहे, फक्त आधी स्वत:ला विश्वास देता यायला पाहिजे. 12 नापास कुमार शर्मा ते आयपीएस अधिकारी मनोज कुमार शर्मा हा खडतर प्रवास 12 Fail या सिनेमातून सगळ्यांपर्यंत पोहोचला.अशीच काहीशी गोष्ट आहे ती म्हणजे कर्जतच्या आदिवासी पाड्यातील एका तरुणाची.
कर्जत तालुक्यातील ऐनाचीवाडी हा परिसर म्हणजे अत्यंत दुर्गम भाग. या अल्पशिक्षित आदिवासीवाडीमधील एक तरुण जो दहावी नापास होता आज तो
तरुण महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात १५ वा क्रमांक मिळविला आहे. दहावीच्या परीक्षेत नापास झालेला पण महाराष्ट्रात अव्वल आलेला या तरुणाचं नाव नयन वाघ. नयनने .2020 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली होती. त्यात तो पास देखील झाला. मात्र मैदानी प्रशिक्षण घेताना अपघात झाला आणि पोलीस उपनिरीक्षक होण्याचं स्वप्नं हुलकावणी दिल्यासारखं लांब गेलं. यानंतरही नयनने हार मानली नाही.
नांदगाव ग्रामपंचायती मधील ऐनाची वाडी येथील विठ्ठल वाघ या आदिवासी शेतकऱ्याचा मुलगा झुगरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत चौथीपर्यंत शिकला. नंतर विठ्ठल वाघ यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने नयनला मुरबाड तालुक्यातील कान्होळ येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत पाठवले. दहावीची परीक्षा कर्जत तालुक्यातील चाफेवाडी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकणारा नयन वाघ हे दहावी परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही. मग 17नंबर फॉर्म भरून नयन ने परीक्षा दिली आणि तब्बल 90 टक्के गुण मिळवून नयन वाघ दहावी परीक्षेत पास झाला.या काळात सातवी आणि दहावी मध्ये देखील हा विद्यार्थी नापास झाला होता. त्यानंतर पोलीस भरतीची तयारी सुरू केली आणि तीन चार प्रयत्नांनी देखील नयन वाघची पोलीस भरतीत निवड होऊ शकली नाही. मात्र जिद्द कायम ठेवत नयन वाघ याने 2019 पासून एमपीएससीकडे आपला मोर्चा वळविला.
2022 मध्ये हाच तरुण नयन वाघ पोलीस उप निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला.त्यावेळी मैदानी प्रशिक्षण घेत असताना नयन वाघ याला मैदानात अपघात झाला आणि तेंव्हापासून पोलिस उपनिरीक्षक होण्याचे आपण अर्धवट राहिले.मात्र आपल्याला अधिकारी व्हायचे आहे या उद्देशाने नयन वाघ यांनी पुन्हा जोरदार तयारी केली आणि नयन ने 2024 च्या राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कमाल केली.अनुसूचित जमाती प्रवर्गात नयन वाघ राज्यात 15व्या क्रमांकावर अव्वल स्थान मिळवलं. दरम्यान जनरल मेरीटमध्ये 15 वा क्रमांक मिळवत त्याने यशाला गवसणी घातली आहे. सध्या स्पर्धा परीक्षा अतिशय कठीण झाली आहे. याचं कारण म्हणजे बदलता अभ्यासक्रम. मात्र पठ्याने हार मानली नाही, प्रयत्नांची पाराकाष्ठा केली आणि आज राज्यातील महत्वाच्या अशा लोकसेवा आयोग या स्पर्धा परिक्षेत त्याने चांगलीच बाजी मारली आहे.






