फोटो सौजन्य - सौशल मीडिया
NEET Paper Leak 2026 : नीट पेपर फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधुन एका व्यक्तीला ताब्यात घेतले. तत्पुर्वी, नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने राजस्थानच्या पोलिसांच्या विनंतीवरून जिल्ह्यातील नांदगाव येथील रहिवासी शुभम खैरनार (३०) याला ताब्यात घेतले होते. पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीला नाशिक इंदिरानगर भागातून पकडण्यात आले.
वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नीट (UG)-२०२६ ही परीक्षा ३ मे रोजी आयोजित करण्यात आली होती. मंगळवारी (१२ मे २०२६) परीक्षा रद्द करण्यात आली. यावेळी सरकारने सीबीआयला या “गैरप्रकारांची” व्यापक चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. या दरम्यान, या पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्याशी देखील जोडले असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवले आहे. तिथे परीक्षेस बसलेल्या एका विद्यार्थ्यांच्या पालकाने मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनुसार, लातूरमधील एका खासगी कोचिंग क्लासने नीट (UG)-२०२६ परीक्षेपुर्वी आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक सराव परीक्षा (Mock Test) आयोजित केली होती. धक्कादायक बाब म्हणजे या सराव परीक्षेतील ४२ प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांशी हूबेहूब जुळत होते. या तक्रारीत कोचिंग क्लासचा पेपरफुटीच्या मोठ्या रॅकेटचा समावेश असल्याचेही बोलले जात आहे.
हे दावे गांभीर्यांने घेत पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) समीरसिंह साळवे यांना तातडीने चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. लातूर पोलीस प्रशासनाने नागरिकांना नीट पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती मिळाल्यास किंवा पुरावा अढळल्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे. संबंधित माहिती असलेल्या व्यक्तींनी एसडीपीओ साळवे यांच्याशी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे सांगण्यात आले.






